" निसर्ग यात्रा " पाहण्यासाठी हाजारो भाविक भक्तांची मांदियाळी
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या गुंडा ( ता. कंधार) येथील नागबर्डी टेकडीवर नागपंचमी निमित्त दरवर्षी मोठ्या श्रद्धेने भरत असलेली नागदेवतेची यात्रा २ऑगस्ट रोज मंगळवारी असून भाविकांच्या रांगाच रांगा ची मांदीयाळी रस्त्यावर दिसून येणार आहे.
कोरोना कालावधी नंतर भरणाऱ्या या यात्रेत या वर्षी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नांदेड- उस्माननगर_हळदा - कौठा- बिदर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लाडका फाट्या जवळील नागबर्डी टेकडीवर परिसरातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची मोठी गर्दी असते. नागबर्डी टेकडीवर नागदेवतेचे जागृत व जाज्वल्य देवस्थान आहे. या टेकडीच्या परिसरातील कडूनिंब झाडे कुणीही तोडत वा जळतण म्हणून वापरत नाहीत. कडूनिंब झाड तोडणे पाप समजले जाते. या टेकडी पासून शिव हद्दीत मोठमोठे कडूनिंब झाड भरलेल्या शेतात जागेवर कुजतात पण कुणीही त्याला श्रद्धेने हात सुद्धा लावत नाहीत. हे आगळेवेगळे निसर्ग संगोपनासाठी जागृती देणारी ही यात्रा परिसरातील पवित्र यात्रा म्हणून ओळखली जाते.
पहाटे पासून महिला, पुरुष, बालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. लाडका, हळदा, चिखली, दहिकळंबा, उमरा, कोलंबी, गोळेगाव, शिराढोण सह लोहा, कंधार, नायगाव, मुखेड तालुक्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यात्रेत सहभागी प्रत्येक भाविक मोठ्या श्रद्धेने नागदेवतेला नारळ अर्पण करतात. परिसरातील अनेक गावातून नागपंचमी निमित्त माहेरी आलेल्या लेकीबाळी या यात्रेत नाग देवतेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. घराघरांत उकडीचे गोडधोड पदार्थ नागदेवतेला प्रसाद म्हणून दिले जाते. विशेष म्हणजे या परिसरातील लोक सापांना केवळ हुसकावून लावतात. जीवंत मारत नाहीत. अशी श्रद्धा या परिसरातील अनेक गावातून आहे. अतिशय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर श्रावणात मनाला आनंद देणारा आहे. टेकडीच्या पूर्वेस लाडका साठवण तलाव आहे. टेकडीवरून संपूर्ण परिसरातील हिरवाई मनमोहक दिसते.
कडूनिंबाची असंख्य झाडे, वातावरणात एक नवीन उर्जा निर्माण करतात. सर्व स्तरातील भाविकांना निसर्गाच्या सानिध्यात रममाण करणारी नागबर्डी येथील यात्रा केवळ जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणून ओळखली जाते. या परिसरातील गावागावातील बाहेर शहरात काम धंद्यासाठी गेलेली कुटुंबे नागपंचमीच्या यात्रेसाठी आवर्जून येतात हे विशेष. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या यात्रेत मिठाई, पूजेच्या साहित्य, विविध प्रकारच्या दुकानांची गर्दी असते. या वर्षी महामार्ग मुळे यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.