जांब (बु) येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जण जखमी -NNL

दोन घरफोडी मध्ये ४७ हजाराची ऐवज लंपास


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड तालुक्यातील जांब ( बु . ) येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला . यावेळी दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत . दोघांनाही नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . दोन ठिकाणी घरफोडी करुन सोन्या - चांदीचे दागिणे व रोख १२ हजार ५०० रुपये असा एकुण ४६ हजार ९ ०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला . 

मुखेड तालुक्यातील जांब येथील जळकोट रोडवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागे गणपत कानगुले व शिक्षक राजेंद्र करदाळे यांची घरे आहेत . जांब ( बु . ) हे तालुक्यातील मोठे गाव आहे . १ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शिक्षक राजेंद्र करदाळे यांच्या घरात प्रवेश केला . यावेळी चोरट्यांनी कपाट फोडून ३४ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले . करदाळे यांच्या घराच्या पुढील लाईनमध्ये असलेले व्यापारी व्यंकट पांपटवार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला . 

यानंतर पांपटवार यांच्या घराचे तोडलेले कुलूप घेऊन दरोडेखोरांनी व्यापारी गणपत कानगुले यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला . कानगुले यांचे घर दोन मजली आहे . तळमजल्यावर न जाता चोरटे थेट वरच्या मजल्यावर गेले . वरच्या मजल्यावरील घराचे दार लाथा मारुन तोडले . आत खोलीत शोभाताई कानगुले खाली झोपल्या होत्या तर पलंगावर दीपक हे झोपले होते . चोरटे आत आल्याने शोभाताई जाग्या झाल्या . चोरट्यांनी त्यांना कपाटाची चावी मागितली . मात्र त्यांनी चावी दिली नाही . त्यामुळे चोरट्यांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली . हा गोंधळ सुरू असताना दीपक जागा झाला . त्याच्या तोंडावर देखील कुलूप फेकून मारत चोरट्यांनी त्याला जखमी केले . तसेच त्याला लोखंडी रॉडनेही मारहाण केली . 

यावेळी चोरट्यांनी नगदी १२ हजार ५०० " रुपये चोरुन नेले . यानंतर चोरट्यांनी गंगाधर मोरे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला . मात्र त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर चोरटे पळून गेले . हा गोंधळ ऐकून नागरिकांनी बीट जमादार भानुदास गिते यांना फोन करुन माहिती दिली . त्यानंतर जखमी शोभाताई कानगुले ( ५० ) आणि दीपक कानगुले ( २३ ) यांना मुखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथून पुढे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे . या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे . घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे तर वरिष्ठ अधिकारी मुखेड येथे तळ ठोकून आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बोधगिरे करित आहेत . 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी