महसूल कर्मचारी संघटनेचे ना. तहसिलदार महेश हांडे यांच्या विरोधात बंड -NNL

तलाठी,मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्या प्रकरणी महसूल संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन 


मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तहसील कार्यालयातील कार्यरत महसूल-१ चे नायब तहसीलदार महेश हांडे यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी, महसूल सहाय्यक यांना नाहक त्रास देऊन आडमुठी धोरण कर्मचाऱ्यांविरोधात राबवून अपमानास्पद बोलल्यामुळे महसूल कर्मचारी संघटना व तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने त्यांच्या विरोधात दि.५ ऑगस्ट रोजी बंड करून तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे कार्यवाही करून बदली करावी अशी मागणी करण्यात आली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुखेड तहसील कार्यालयातील कार्यरत महसूल-१ चे निवासी नायब तहसीलदार महेश हांडे यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी, महसूल सहाय्यक यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, अनाडी, अनपड आहेत, मूर्ख - नालायक आहेत अशा शब्दात हिणवून बोलणे, एखाद्या कर्मचाऱ्याला काहीच काम नसतानाही बोलावून ताटकळत थांबवून घेणे अन स्वतः मात्र मोबाईल मध्ये व्यस्त राहणे. एखादा कर्मचारी साहेब ताटकळत का बसवले असे विचारले असता त्या कर्मचाऱ्यांना बदली करण्याची धमकी देणे, एक कर्मचारी निलंबित झाला अजून काही माझ्या टार्गेटवर शिल्लक आहेत त्यांनाही निलंबित केल्याशिवाय राहणार नाही अशा धमक्या देऊन कर्मचाऱ्यांचे मनोबल खचवण्याचे काम महेश हांडे यांनी केले आहे. 

 कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी, महसूल सहाय्यक यांच्या विरोधात भडकावणे,एखादा कर्मचारी चुकला तर समज देण्याऐवजी निलंबनाची धमकी देऊन त्यांच्याकडून मर्जीच्या हॉटेलमध्ये मेजवानीची मागणी करणे, कर्मचाऱ्यांमध्येच मतभेद निर्माण करून दोघांत भांडणे लावणे, कार्यालयीन व अन्य कर्मचाऱ्याने चांगले काम केल्यास त्याचा सन्मानाबद्दल संताप व्यक्त करून त्याच्यावर टीका टिपणी करणे, कार्यालयीन कामकाजात गैर व्यवहार करण्यास परावृत्त करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन टार्गेट करणे तसेच तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेला मी मानत नाही जुमानत नाही अशी भाषा वापरणे, संघटनेच्या पदाधिकाऱ्याना जाणीवपूर्वक त्रास देणे, नियमित कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे या सर्व बाबींना तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी हे निवासी नायब तहसीलदार महेश हांडे यांच्या आडमुठी धोरणामुळे कर्मचारी दबावाखाली काम करीत आहेत तशी दहशत महेश हांडे यांनी निर्माण केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अशा निवासी नायब तहसीलदार महेश हांडे यांची १५ दिवसांत तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा दि.१७ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल.असे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. 

 जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सल्लागार, नांदेड जिल्हा महसूल संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्यासह तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष व महसूल कर्मचारी संघटना अध्यक्षासह सर्व तलाठी,मंडळ अधिकारी व महसूल सहाय्यक,कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी