नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL


प्रस्तावना : वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र 
 या लेखातून स्पष्ट केले आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.

नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व ! - पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजांद्वारे समुद्री प्रवास अन् व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात.

सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. नियमितपणे पाऊस पडण्यात सूर्यासह समुद्रदेवाचेही मोलाचे योगदान आहे. समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे वरुणदेवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुणदेवाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुणदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्या आणि समुद्र यांचा मोलाचा वाटा आहे. समुद्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त होते.

अहंकाराच्या बळावर नव्हे तर,विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे नारळी पौर्णिमेच्या उदाहरणातून सिद्ध होणे - कुणालाही आश्‍चर्य वाटू शकते की, विशाल समुद्राला केवळ लहानसा नारळ अर्पण केल्यावर तो त्याचे विक्राळ रूप शांत कसे करतो. ही किमया हिंदु धर्माच्या श्रेष्ठतेत दडलेली आहे. नारळ हा श्रीफळ, म्हणजे शुभफळ असल्यामुळे त्याकडे ब्रह्मांडातील समस्त चांगली स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होतात. हा नारळ नुसता समुद्राला न देता, समुद्रदेवाला संपूर्ण शरण जाऊन समर्पित भावाने अर्पण केल्यामुळे समुद्रदेव प्रसन्न होतो. यावरून आपल्या हे लक्षात येते, देव भावाचा भुकेला आहे. 

त्यामुळे तो वस्तूने प्रसन्न होत नसून वस्तू अर्पण करण्यामागे कार्यरत असणार्‍या भावाने प्रसन्न होतो. भावामुळे भगवंत भक्ताला वश होतो. कलियुगातील विज्ञानवादी मानव वैज्ञानिक प्रगती करून निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे निसर्ग मनुष्याच्या आधीन तर झालेलाच नाही, उलट तो मानवावर कृद्ध झालेला आहे. हिंदु संस्कृतीची शिकवण कुणावर वर्चस्व स्थापन करण्याची नसून महाशक्तीला शरण जाऊन तिचे वर्चस्व स्वीकारून तिचे पूजन करण्याची आहे. त्यामुळे निसर्गासारखी महाशक्ती निसर्गोपासक कर्महिंदूंवर प्रसन्न होऊन त्यांच्यासाठी अनुकूल बनते आणि त्यांच्या आधीन होते. अहंकाराच्या बळावर नव्हे तर, विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे मनुष्याच्या लक्षात येईल, तेव्हा खर्‍या अर्थाने मनुष्याची प्रगती झाली, असे म्हणता येईल.

समुद्र पूजन करायची पद्धत - श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.

नारळी पौर्णिमच्या दिवशी करायची प्रार्थना - नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे, तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे, यांमुळे समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. तसेच ‘तुझ्या रौद्ररूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे’, अशी प्रार्थनाही करतात.

समुद्राला नारळ अर्पण कसा करावा  ? - नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; त्यामुळे तो भावपूर्ण हळुवारपणे पाण्यात सोडावा अन् वरील प्रार्थना करावी !

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते

संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था

संपर्क- 9284027180

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी