खी गोगलगायींचा विशिष्ट क्षेत्रात एकदा
प्रादूर्भाव झाला की, साधारणत: दोन वर्षापर्यंत त्यांना अनुकूल वातावरण निर्माण
होईपर्यंत त्या सुप्तावस्थेत राहतात. सततचे ढगाळ हवामान व रिमझिम पडणारा पाऊस, सुप्तावस्थेतील
शंखी गोगलगायींना पुन्हा ऊर्जितावस्थेत येण्यास उपयोगी ठरत असल्याने पावसाळ्यात
त्या सर्वत्र सहज दृष्टीस पडतात व मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करतात. नदी काठच्या
शेतात शंखी गोगलगायींचा प्रादूर्भाव झालेला असल्यास आणि नदीस पूर येऊन ते पुराचे
पाणी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतच्या प्रदेशात या गोगलगायींचा प्रसार होऊन तेथील
क्षेत्रातही प्रादूर्भाव होतांना दिसून येतो. अशा या घातक किडीचा वेळीच बंदोबस्त
करून पिकाचे पुढील नुकसान टाळणे गरजेचे असते. तरी शेतकरी बांधवांनी वेळीच या किडीची
सविस्तर माहिती जाणून घेऊन उपाययोजना कराव्यात.
ओळख व जीवनक्रम:
शंखी गोगलगाय आकाराने मोठी असून तिचे वजन १०० ते १५०
ग्रॅम असते. शंख लांब निमुळते भुरकट, बदामी, करड्या रंगाचे असून त्यावर फिकट तपकिरी
लांबट पट्टे असतात. गोगलगाय १० ते १५ से. मी. लांबीची असून दिवसा तिचे शरीर शंखात
लपविते. गोगलगाय शेताच्या बांधाला छिद्रे करून तेथील माती भुसभुशीत करते व ३ ते ४
दिवसात १०० ते ४०० अंडी घालते. अंडी पांढरट पिवळसर रंगाची असून साबुदाण्याएवढी ५
ते ६ मि. मि. आकाराची असतात. सर्वसाधारणपणे १५ ते १७ दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर
येतात. ते प्रथम माती व शंखी अंड्याच्या कवचावर ३ ते ४ दिवस उपजीविका करतात.
पिलांची वाढ पूर्ण होण्यास ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेली शंखी
गोगलगाय ५ ते ६ वर्ष जगते.
नुकसानीचा प्रकार: - शंखी
गोगलगायीचे पिल्ले व प्रौढ रात्रीच्या वेळी अधाशीपणे शेतातील घास, कोबी,
फ्लॉवर, बटाटा, मिरची, वांगी, वेलवर्गीय भाज्या, मका, ज्वारी, गहू, सोयाबीन तसेच
द्राक्षासारखी फळपिके इ. पिकांची पाने, कोवळे भाग कुरतडतात तसेच खोडावरील साल
देखिल खातात. गोगलगायीने खाल्लेल्या पानांवर गोलाकार छिद्रे आढळतात. प्रादूर्भाव
जास्त प्रमाणात असल्यास, रोपांमध्ये पानांच्या कमतरतेमुळे प्रकाश संस्लेषनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात मंदावते व रोपे खुरटी
राहतात.
गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे: - ढगाळ वातावरण, कमी प्रकाश, संततधार पावसामुळे जमिनीत तयार झालेली भरपूर ओल या बाबी किडीची कार्यक्षमता वाढवितात. जास्त आर्द्रता, कमी तापमान (२० ते ३२० सें. ग्रे.) गोगलगायींना पोषक असते. रब्बी हंगामात गवतावर तसेच पिकांवर सकाळी भरपूर दव पडते त्यामुळे या कालावधीत देखिल गोगलगायी नुकसान करतात. तथापि उन्हाळ्यात तापमान ३०० सें. ग्रे. पेक्षा जास्त व आर्द्रता ८० टक्के पेक्षा कमी होताच तसेच हिवाळ्यात तापमान ५ ते ८ ० सें. ग्रे. च्या खाली व आर्द्रता ६५ टक्के पेक्षा कमी झाल्यास गोगलगायी मरतात व त्यांची संख्या कमी होते, तर काही गोगलगायी तेथेच सुप्तावस्थेत जातात व त्या आठ महिने पर्यंत या अवस्थेत ओलसर थंड जमिनीत, मातीत, सावलीत किंवा झुडपाच्या बुंध्याशी राहू शकतात.
नियंत्रण:- § शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्या पासून रोखता येते.
§ प्रादुर्भावीत
शेतातील बांधाचे बारकाइने निरीक्षण करावे व रबरी हातमोजे घालून शंखी गोगलगायी व
त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
§ गुळाच्या
द्रावणात (१ किलो गुळ प्रती १० लिटर पाणी) गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या
वेळी शेतात / पिकाच्या ओळीत पसरुन द्यावीत. त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा
करून उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात किंवा केरोसीन मिश्रित पाण्यात
टाकून माराव्यात किंवा खोल खड्यात पुरून वरून चुन्याची भूकटी टाकून खड्डा मातीने
झाकावा.
§ लहान
गोगलगायींच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी.
§ शेत
किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतल्या बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच
पट्टा टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.
§ मेटाल्डिहाईड
२.५ टक्के भूकटीचा (५० ते ८० ग्रॅम / १०० स्क्वे. फूट) वापर गोंगलगायी च्या मार्गात
/ दोन पीक ओळीत किंवा प्रादुर्भावीत क्षेत्रात केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण करता येते.
§ गोगलगायींच्या
नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करता येतो. त्यासाठी गहू किंवा भाताचा भुसा
किंवा कोंडा ५० किलो अधिक २५ ग्रॅम यीस्ट गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गुळ प्रती
१० लिटर पाणी) १२ ते १५ तास भिजत ठेवावे. त्यात मिथोमिल ४० एस. पी. या कीटक
नाशकाची ५० ग्रॅम भुकटी मिसळावी. अशा रितीने तयार केलेले आमिष संध्याकाळच्यावेळी
प्रादुर्भावीत शेतात पसरुन द्यावे. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातांमध्ये
रबरी मोजे घालून गोळा कराव्यात व १ मीटर खोल खड्ड्यात पुरून टाकाव्यात.
§ मिथोमिल
हे अत्यंत विषारी कीटकनाशक असल्याने पाळीव प्राणी तसेच भटके प्राणी किंवा पक्षी
आमिषाने मेलेल्या गोगलगायी खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
§ सदर
कीटकनाशक अत्यंत विषारी असल्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करावा. वापर करतांना चेहरा, डोळे, हात किंवा एकंदरच संपूर्ण
शरीराचे संरक्षण करणे गरजेचे असल्याने, संरक्षक पोषाख, हातमोजे, संरक्षक चष्मे आणि
मास्क इ. चा वापर करावा.
टिप - सद्य परिस्थितीत या
बहुपिकभक्षी किडीच्या पिकनिहाय आर्थिक नुकसान पातळी बाबत माहिती उपलब्ध नसल्याने
किड नियंत्रणाचा मोहिमेच्या स्वरुपात अवलंब करून किडीच्या अंडी, पिल्ले व प्रौढ अवस्था जास्तीत जास्त प्रमाणात गोळा करून नष्ट
केल्यास चांगले नियंत्रण करता येणे शकय होईल.
(तांत्रिक
माहिती व सहकार्य : म.फु.कृ.वि. राहुरी)