कल्याणकर कोचिंग क्लासेसचा निरोप समारंभ
नांदेड| प्रयत्नांची सीमा पार करणारा विश्वविजेता होतो मात्र त्याने प्रयत्न करताना कोणतीच कसर बाकी सोडता कामा नये. बुद्धीच्या कुवतीवर यशस्वीता प्राप्त होत नसते तर धडपडीच्या आकाशाला गवसणी घालणारे स्वकल्याणा बरोबर विश्वाचे कल्याण करतात.. नागेश कल्याणकर यांनी हीच प्रयत्नवादी दीक्षा तुम्हाला दिली आहे असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले .
ते नागेश कल्याणकर क्लासेसच्या इयत्ता बारावीच्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. या कार्यक्रमास डॉ चंद्रशेखर वाघमारे पाटील आणि युवा कीर्तनकार प्रा डॉ धाराशिव शिराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रमुख अतिथीचे डॉ नागेश कल्याणकर यांनी शाल आणि पुष्पहार देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे आयोजक डॉ नागेश कल्याणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कल्याणकर क्लासेसने असंख्य डॉक्टर आणि अभियंते घडवले असून ते देशासाठी निष्कलंक, निस्वार्थ आणि निर्मोही पद्धतीने कार्य करत असल्याचे कल्याणकर यांनी प्रतिपादन केले. या क्लासेसची यशाची अखंडित परंपरा आजही चालू असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्रारंभी काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून नागेश कल्याणकरांच्या संपन्न चारित्र्याची आणि सर्वोत्तम अध्यापनाची ग्वाही दिली.
ग्रामीण गरीब तरुणांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांची परिपूर्ती येथे होत असल्याचे विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापूर्वक प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ चंद्रशेखर वाघमारे पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचा उल्लेख करून स्मृती प्रफुल राहण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची आवश्यकता प्रतिपादन केली . त्यांनी डॉ होण्याच्या स्वप्नांचा प्रवास सुखकर करण्याचे मार्ग विशद केले. कार्यक्रमाचे सहभागी सूत्र संचालन कु प्रगती नाईक आणि कुमारी अंकिता तरटे यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णू कल्याणकर यांनी केले.