हिमायतनगरातील नागरिकांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा; नगरपंचायत व ठेकेदारच्या नाकर्तेपणा -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
सुरु असलेल्या संततधार पावसाने हिमायतनगर व शहर परिसरातील रान शिवारात पाणी साचले असून, हेच साचलेले पाणी शहरातील वॉर्ड क्रमांक ४  मधील नागरिकांच्या घराच्या बाजूला वेढल्याने नागरिकांना घरातून बाहेर निघणे अवघड बनले आहे. पावसाचे व नाल्याची घाण पाणी थेट मजुरदार व गोर गरिबांच्या घरात शिरत असंल्याने साथीचे आजर पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारास नगरपंचायत प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराचा नाकर्तेपणा आणी राजकीय नेत्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप या भागातील महिला - पुरुष नागरिक करत आहेत.   

हिमायतनगर नगरपंचायतीने मागील पंचवार्षिक काळात ५० ते ६० कोटी रुपयाच्या निधीतून शहर विकासाची कामे केली मात्र ती कुठं..? केली असा सवाल वॉर्ड क्रमांक ४ सह शहरातील इतर वॉर्डातील नागरिक विचारीत आहेत. हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर नागरिकांची समस्या मार्गी लागतील असे वाटले होते. मात्र ती अपेक्षा सपशेल खोटी ठरली असल्याचे शहरातील चिखलमय आणि खड्डेमय तसेच वाहत्या पाण्याची वाट मोकळी नसल्याने नागरिकांच्या घरात शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावरून दिसते आहे. शहराच्या विकासासाठी उपलब्ध झालेल्या कोट्यावधीचा निधीतून राजकीय पुढाऱ्यांची आपल्या टोलेजंग इमारती बांधून स्वतःचे घरे भरली आहेत. त्यामुळे शहरातील अनेक वॉर्ड आजही खेड्यात गेल्याप्रमाणे पाहावयास मिळते आहेत. अनेक प्रभागात रस्ते व नाल्याचे झालेले निकृष्ट बांधकाम आणि त्यातच पाणी पुरवठ्याच्या नावाखाली खोदून ठेवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यामुळे झालेला चिखल व खड्डेमय रस्त्यामुळे उघडे पडले आहे.  


वॉर्ड क्रमांक ४ नेहरूनगर मध्ये असलेल्या एका विहिरीचे अतिक्रमण नगरपंचायतीने गतवर्षी काढले. मात्र त्यातील निघालेला गाळ बाजूला नेऊन न टाकता राष्ट्रीय महामार्गावर उंच कट्ट्या प्रमाणे साठून ठेवला आहे. त्यामुळे रात्रीला झालेल्या मुसळधार पावसाने येथील रान शिवारात साचलेलं पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पुराच्या पाण्यामुळे परिसरातील घरांना वेढा पढला आहे. तर अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. या पावसाने गल्लीबोळात तळे साचले असून, नाल्याची दुर्गंधी आणि पावसाचे पाणी साचून राहिल्यान नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असताना देखील नगरपंचायत प्रशासनाचे नागरिकांना निर्माण होणाऱ्या या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारच्या नाकर्तेपणा - हिमायतनगर शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारच्या रस्त्याचे व नाल्याचे काम अर्धवट ठेऊन मनमानी कारभार केला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या पाण्याच वेध शहरातील नागरिकांच्या घरात होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी