(आज २६जुलै २०२२ रोजी मा.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा वाढदिवस.त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय)
महाराष्ट्र ही लढवय्यांची भूमी आहे. राजे छत्रपती शिवराय व त्यांच्या मावळ्यांचा लढवय्यापणा आपल्या रगारगात आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांचा अन्याया विरुद्ध 'मोडेन पण वाकणार नाही'हा बाणा आपल्यात आहे.इतिहासात असे कीतीतरी पुरावे आहेत ज्यांनी लढवय्यापणा सोडला नाही. स्वाभीमानासी तडजोड केली नाही. त्यांना अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. पण हे ही तितकेच खरे आहे की ज्यांनी स्वाभिमान ठेवुन लढत राहीले ते किर्तीमान बनले. आपले जीवन खर्ची करून पद, प्रतिष्ठा,पैसा प्राप्त केला नाही. त्यांचा इतिहास लिहिला गेला. तेच इतिहासात अमर झाले.ज्यांनी पद, प्रतिष्ठा व पैशासाठी चापलुसी केली ते भाट म्हणून गणले गेले. त्यांना आपला इतिहास प्रतिष्ठा देत नाही.अशी परंपरा चालवणारे अनेक नेते आपल्या महाराष्ट्रात झाले, ज्यांनी स्वाभिमान त्यागला नाही. ज्या स्वाभिमानाला गोरगरिबांच्या कामाचा आधार होता. याचेच एक उदाहरण म्हणजे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हा लेख लिहितोय त्यांचे वडील लोकनेते स्व. गोपीनाथ रावजी मुंडे साहेब.त्यांनी आपल्या आयुष्यात लढवय्यापणा सोडला नाही स्वाभिमान कधीच गहाण ठेवला नाही. त्यामुळेच त्यांना संघर्ष करावा लागला असेल पण त्यामुळेच ते सर्वसामान्यांच्या देव्हा-या पर्यंत जाऊन पोहोचले. तोच वसा आणि वारसा आपल्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची लढवय्येपणाची व स्वाभिमानाची परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम करणाऱ्या नेत्या मा.सौ. पंकजाताई पालवे- मुंडे होत.
आपले वडिल कसे लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट उपसत होते. हे त्यांनी जवळून पाहिले म्हणून उच्च विद्या घेऊन अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर ही आपल्या वडिलांच्या आग्रहावरून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या राजकारणात आल्या. सुरुवातीला वडिलांच्या निवडणुकीच्या प्रचार सभांना व नंतर स्वतः निवडणुकीत उभे राहून दोन वेळेस विधानसभेवर परळी मतदारसंघातून निवडून आल्या. वडिलांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या समस्या सोडविण्यासाठी
त्यांनी एका डोळ्यात आसू आणि दुसर्या डोळ्यात जनतेच्या विकासाची स्वप्ने घेऊन त्या कार्यरत झाल्या. ज्या भाजप पक्षात त्या कार्यरत होत्या. त्या पक्षाला निवडणुकीत वडिलांनी लोकसभेच्या वेळी प्रचंड बहुमतांनी निवडून आणले होते. तीच परंपरा पुढे चालविण्यासाठी त्यांनी विधानसभेच्या वेळी संघर्ष यात्रा काढून या पक्षाला घराघरात व मनामनात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. ज्या पक्षाला माधव या मंत्राच्या करवी वडील गोपीनाथरावजींनी उच्चवर्णीय व उच्चवर्गीय पासून बहुजनांचा पक्ष इथपर्यंत आणून सोडले होते. ज्या वडिलांनी या पक्षावर इतके प्रेम केले की आपली पहिलीच लाडाची मुलगी जन्माला आल्यावर तिचं नाव पंकजा ठेवले.ज्याचा अर्थ पंक म्हणजे चिखल व ज म्हणजे जन्म घेणारा म्हणजेच कमळ.
ज्या भाजप पक्षाचे चिन्हच कमळ त्या पक्षाच्या नावावरून आपल्या मुलीचे नाव ही पंकजा ठेवले. ते इतके आपल्या पक्षासी एकरूप झाले होते. तोच पक्ष या पितापुत्रीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात सत्तेवर आला. हे त्यावेळी सर्वांनीच मान्य केले. नंतर ताईंना जलसंधारण, ग्रामविकास,महिला बालकल्याण यासारखी खाती देऊन कॅबिनेट मंत्री केले.ज्यामुळे बहुजनांच्या विकासाला चालना मिळाली. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली. ग्रामविकास खात्यामार्फत ग्रामीण विकासासाठी रस्त्यांचे जाळे पसरविले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक गावे पक्क्या रस्त्यांनी जोडले. सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला, विविध सरपंच परिषदा घेतल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक महामार्ग राज्यात आणले. महिला बाल कल्याण खात्यामार्फत महिला सबलीकरणाचे अनेक निर्णय घेऊन उपक्रम राबविले. लेक वाचवा राष्ट्र वाचवा जनजागृती अभियान राबविले, स्री भ्रूण हत्या करणार्यांना कठोर शासन झाले पाहिजे ही भूमिका घेतली.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविली. मुलींच्या वसतीगृहाच्या नीधीत दुप्पट वाढ केली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ केली. १८१ टोल फ्री क्रमांकावर महिलांना अडचणीत फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, स्तनपानासाठी महिलांना मोठ्या कार्यालयात हिरकणी कक्षाची स्थापना केली. महिला बचत गटाला भरीव मदत करून अमेरिकेपर्यंत बाजारपेठ उपलब्ध करून दिली. बचत गटांसाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन केले.प्रत्येक जिल्ह्यात बचत गटासाठी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर बाजारपेठ स्थापन केली.अनाथांसाठी आरक्षणाची तरतूद केली. महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले. जी.एस.टी. तुन सॅनेटरी नॅपकिनला मुक्त केले. कुपोषित बालकांसाठी सकस आहार योजना प्रभावीपणे राबविली. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा निर्णय घेतला.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न केला असे कितीतरी लोकोपयोगी कामे त्यांनी केली.
पक्षीय स्तरावर ज्या जबाबदाऱ्या पक्षाने त्यांच्यावर सोपवल्या मग त्यात भाजपा युवा मोर्चाच्या राज्य अध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी असो कि पक्षाच्या कोअर कमिटीत दिलेली जबाबदारी असो. त्यांनी त्या जबाबदा-या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. पक्षानेही त्यांना बरेच काही दिले पण एवढेही नाही की जेवढे त्यांच्या पीत्याने व त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी भावना सर्वदूर व्हायला लागली आणी पुढे मग त्यांच्याकडून जलसंधारण खाते काढुन घेण्यात आले. ज्या खात्याचे त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचे काम करून या खात्याला केंद्रीय स्तरावरील नेतृत्वाने गौरवावे इथपर्यंत पोहचवले होते. यावेळी बहुजनांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नंतर त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न ही केला गेला पण ताई डगमगल्या नाहीत, डगमगते ते कसले बहुजनांचे नेतृत्व? त्यात त्यांना स्वाभिमानी वडिलांचा वारसा लाभलेला. त्या पुन्हा जोमाने कामाला लागल्या या बरोबरच अन्य खात्याचे कामकाजही त्यांनी इतक्या उच्च कोटीला नेले की त्याची ही दखल केंद्रीय नेतृत्वाला घ्यावी लागली.
याबरोबरच आपल्या वडिलांचे परळी वै.जवळ गोपीनाथ गड नावाचे स्मारक उभारून तेथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न त्या सतत करत असताना दिसतात. बहुजनांचे स्फूर्ती या ऊर्जा स्त्रोत म्हणून देखील याकडे पाहावे असे ते स्मारक बनविण्यात आले आहे, याच बरोबर वंजारी समाजाचेच नव्हे तर बहुजनांचे श्रद्धास्थान असलेले वै. राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे स्मारक देखील बाबांच्या मूळ गावी निर्माण करून त्यांनी मोठे काम केल्याचे दिसून येते. या ठिकाणी दरवर्षी दसरा मेळावा घेऊन बहुजनांना सकारात्मक संदेश देण्याचे काम ते मागील काही वर्षापासून करत असताना दिसून येतात.
अशा या लोकोपयोगी कामाने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा आवाज हळू हळू जोर धरायला लागला आणि कुठे माशी शिंकली कळले नाही तेथून मात्र या बहुजनाच्या रणरागिनीला पायबंद घालण्याचा कार्यक्रम आखला गेला. असेच पुढील सर्व चित्र पाहिल्यास वाटते. तदनंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ताईंचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव होतो त्या पराभवा बद्दलही अनेक तर्कवितर्क केले जातात त्यांच्याच पराभवाबद्दल सर्वाधिक तर्क महाराष्ट्रात होतात त्यामुळे ही शंका बळावत जाते. नंतर ते आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रम घेतात तिथे आपल्या मनातील भावना लोकशाहीच्या मार्गाने व्यक्त होतात आणि त्यामुळे ही भविष्यातील या लोकनेत्या नेतृत्वाला आणखीन खिंडीत पकडण्याचे काम केले जाते.
नंतर त्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, वरळी, मुंबई येथील कार्यालयाचे उद्घाटन करून बिगर राजकीय संघटने च्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे ठरवितात, त्यांचे कामही सुरू करतात.मराठवाड्याच्या न्याय हक्कासाठी औरंगाबाद येथे उपोषण ही केले जाते पण त्याचा प्रभावही म्हणावा तेवढा राहणार नाही याची काळजी घेतलेली लक्षात येते. त्यानंतर विधान परिषदेच्या नियुक्त्या होतात त्यात त्यांना विधान परिषदेसाठी नामांकन करण्याची सर्व कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले जाते आणि अचानक दिल्लीवरून काहीतरी निरोप येतो आणि त्यांना त्यापासून वंचित ठेवले जाते. त्यानंतर काही दिवसांनी पक्षाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतात त्यात त्यांच्या खासदार भगिनी डॉ.प्रीतम ताईंना महाराष्ट्र राज्याच्या पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले जाते परंतु पंकजा ताईंना या मध्ये कुठेच स्थान दिले जात नाही. पंकजा ताईंना लवकरच केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते तेव्हा त्यांच्या चाहत्यांसमोर प्रश्न उपस्थित होतो की दिल्लीत काम करणाऱ्या खा. डॉ.प्रीतम ताईंना महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची आणि महाराष्ट्राला ज्यांची गरज आहे, ज्यांचे महाराष्ट्रवर प्रेम आहे आणी महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे.
त्यांना दिल्लीत पाठवायचे ही बढती की अन्य काय? या मुळे लाखो ताई समर्थक नाराज होतात पण गप्प बसण्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा उपायच नसतो.मुंडे समर्थक असलेल्या भागवत कराड यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करुन व तसेच रमेश कराड यांना विधान परिषदेचे सदस्यत्व बहाल करून वंजारी समाजाला पक्ष प्रतिनिधित्व देतोय याप्रकारचे चित्र ही उभे केले गेलेय.परंतू यामागेही काही राजकारण असेल काय? असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतो. पण पक्षासाठी मुंडे साहेबांसी एकनिष्ठ राहून सतत काम करणाऱ्या पक्षनिष्ठ दोघांनाही महत्त्वाची पदे मिळाल्याबद्दल समाजबांधवांना निश्चितपणे मनस्वी आनंद होतोय. एक मात्र खरे की जो संकटाच्या काळी आपल्या सोबत असतो तोच आपला खरा हीतचिंतक असतो मग तो व्यक्ती असो की पक्ष आता तरी पंकजा ताईंना बळ देण्याचे काम पक्ष स्तरावर होताना दिसत नाही असे ताई समर्थकांचे म्हणणे आहे आणि ते पूर्णार्थाने असत्य ही नाही. नंतर विधानपरिषद व परवा राज्यसभेवर पुन्हा डावलले जाते. हे सर्व भविष्यात पक्षाच्या हीताच्या दृष्टीने त्यांना योग्य तो न्याय मिळेल या अपेक्षेत त्यांचे चाहते आहेत. तसे न होता हे असेच होत राहिले तर पुढे काय? असा प्रश्न पडतोच. पण बहुजनांचे नेते अशा कुरघोड्यांना भीक घालत नाहीत.
ते आपला लढवय्येपणा व स्वाभिमान सोडत नाहीत. 'सत्य परेशान हो सकता हैl लेकिन पराजित नहींl ' या न्यायाप्रमाणे भविष्यात सत्याचा विजय होईल ही पण आज बहुजन नेतृत्वाचा आवाज दाबला जातोय त्याचे काय? ताईंना आपला प्रतिस्पर्धी समजून महाराष्ट्राच्या राजकारणातून हटवायचे व केंद्रात पाठवावयाचे असा काही कुटील डाव येथील काही मंडळी शिजवत असतील काय? अशीही चर्चा महाराष्ट्रात सर्वदूर ऐकावयास मिळते. सत्ता आली की खरे हाडाचे कार्यकर्ते व नेते बाजूला राहतात व उप-यांनाच महत्त्व येते. तसेच या पक्षातही होत आहे काय असेही अनेक जणांना वाटावयास लागले आहे. पण असे घडणे पक्ष्यासाठी धोक्याची घंटा असते हे पक्ष नेतृत्वाने वेळीच लक्षात घेतले पाहिज. पण आज तरी तसे होताना दिसत नाही. वेळोवेळी सर्वच पक्षात कमी-अधिक प्रमाणात सत्ता वाटपात बहुजन नेतृत्वावर नेहमी अन्याय झालेला दिसून येतो. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो.हा आवाज दाबण्याचा प्रयत्न फक्त एका पक्षातच होतोय असे नाही तर आपण बारकाईने पाहिले तर बऱ्याच पक्षात हेच चित्र दिसतेय. ही वस्तुस्थिती आहे.
गोपीनाथरावानंतर आता इतर मागासवर्गीयांना आपले प्रश्न मांडण्यासाठी नेता उरला नाही. असे म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्रात ओबीसी जनगणना होत नाही, त्यांच्या आरक्षणावर गदा आणली जाते आहे, महाज्योतीकडे ज्या आस्थेने पाहणे गरजेचे आहे त्या आस्थेने पाहिले जात नाही. आज पंकजाताई सारख्या लोकप्रिय नेत्यां बाबत अशी उपेक्षा होत असेल तर अन्य नेत्यांबद्दल विचार न केलेला बरा.मग बहुजन नेतृत्व संपायला वेळ लागणार नाही म्हणून बहुजन नेतृत्वाने ' बहुजन हिताय बहुजन सुखाय'हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून पक्षीय राजकारणाला बाजूला सारून बहुजनांच्या विकासासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांनी आपला लढवय्येपणा व स्वाभिमान कुणापुढे ही गहाण ठेवता कामा नये. ताईला वगळून पक्षाला पुढे जाता येणार नाही हे पक्षाला ही माहिती आहे. त्यासाठी परवा सत्तांतरात त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावुन घ्यावे लागले.हा संकल्प आज आपण ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण करूयात. या अपेक्षेसह माझा शब्दप्रपंच थांबवतो.
.....प्रा.डॉ. रामकृष्ण बदने, ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर , ता.मुखेड जि.नांदेड, भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५