नांदेड| केंद्र शासनाच्या 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनामध्ये 58 सेवा आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस पध्दतीने देणेबाबत अधिसूचीत केले आहे. यामध्ये वाहनावर असलेला कर्जबोजा रद्द करणे ही एक सेवा आहे. त्यानुसार परिवहन विभागामार्फत ही सेवा फेसलेस पध्दतीने सुरु करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीमध्ये साधारण 35 ते 80 बँकेचे या सेवांसाठी वाहन प्रणालीवर सांधे जोडणी करण्यात आलेली आहे. ज्या बँकेचे सांधेजोडणी झालेली नाही अशानी या सेवेचा लाभ घेण्यासाठी sonar.deepak@nic.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
या नवीन पध्दतीनुसार अर्जदार कर्जबोजा रद्द करण्यासाठी वाहन 4.0 या प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंदणी या प्रणालीवर करावी.त्यानंतर आधार क्रमांकावरील मोबाईल नंबरवर ओटीपी जाणार असून ओटीपीची नोंदणी केल्यानंतर वाहन मालकाचे नाव व कार्यालयीन अभिलेखावरील नाव यांची खातरजमा होणार आहे. त्यानंतर बँकेमार्फत वाहन प्रणालीवरच या वाहनावरील कर्जबोजा रद्द झाल्याची बाब परिवहन कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.
या सेवेसाठी अर्जदारामार्फत नमूना 35 व इतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील. आधार क्रमांकाचा वापर करुन अर्ज केल्यास अर्जदारास कार्यालयात मूळ नोंदणी प्रमाणपत्र अथवा इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी येण्याची आवश्यकता राहणार नाही असेही प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.