नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन कौशल्य विकास’ या विषयावर दि. २५ ते ३१ जुलै असे सात दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये प्रयोगशाळेतील वेगवेगळे उपकरणे हाताळण्यातून मिळालेल्या निष्पत्तीचे विश्लेषण करण्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने ‘संशोधन कौशल्य विकास’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. वैज्ञानिक संशोधन करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी ही कार्यशाळा उपयोगी पडणार आहे.
उद्योगांना चालना मिळण्यासाठी, कुशल तंत्रज्ञ उपलब्ध होण्यासाठी, समाज उपयोगी संशोधन करण्यासाठी इ. सर्व या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही प्रशिक्षण कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून त्यामध्ये देशांतर्गत तज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबतचे परिपत्रक उपलब्ध आहे. या कार्यशाळेत प्राध्यापकांनी, संशोधकांनी नोंदणी करून भाग घ्यावा, असे आवाहन नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी केले आहे.