हिमायतनगरात तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत; शेतीपिकांचे मोठे नुकसान -NNL

नडव्याचा नाला, पळसपूर, घारापुर, पार्डी, रस्त्याची वाहतूक २ तास बंद, राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ४ तास झाली होती ठप्प


हिमायतनगर, अनिल मादसवार| जिल्ह्यात चार दिवसापासून सुरु असलेली पावसाची संततधार आजही चालूच असून, नांदेसह जिल्हावासीयांना सूर्यदर्शन झाले नाही. शनिवार दि.०९ जुलै रोजी दिवसभर पावसाने जोरदार दनकेबाजी केली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील ओढे, ओहळ, पुलावरून पाणी गेल्याने आणि शहरातील नेहरू नगर, मुर्तुजा नगर, सेतू केंद्रासह कृषी अधिकारी कार्यालयास पुराणे वेढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील खैरगाव, हिमायतनगर सह अनेक ठिकाणची मार्ग ४ ते ५ तास बंद होती. पूर ओसरल्यानंतर अनेकांनी घरारची वाट धरली आहे. दरम्यान पुरस्थितीवर हिमायतनगर तहसील प्रशासन लक्ष ठेऊन असून, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती तलाठी पुणेकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. 




हिमायतनगर शहर परिसरात बुधवारपासून पावसाची संततधार सुरूच असून, यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने झड लावल्याने जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे उमरखेड, हिमायतनगर, हदगावसह परीसरातील नदी नाल्याला पूर आला असून, या ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर वरील पातळीवर झालेल्या पावसाचे पाणी पैनगंगा नदीला येऊन मिसळल्याने पैनगंगा नदी दुथडी भारावून वाहते आहे. यामुळे पाण्याला जाण्यासाठी मार्ग नसल्याने नाल्याचे पाणी शेत शिवारात शिरत असल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. तर अनेक शेतजमिनी कट्ट्यासह फुटून खरडून गेली असून, नाल्याचे पाणी जाण्याला मार्ग नसल्याने पुलावरून पाणी वाहून जनजीवन विस्कळीत झाले आहे.


नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेती पिकात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सतत दोन वर्षांपासून हिमायतनगर तालुक्याला ओल्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी चार दिवसाच्या संततधार पावसामूळे खरबाड जमिनी सोडल्या तर ९० टक्के जमिनीतील पिके उन्मळून जाण्याच्या स्थितीत आली आहेत. या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे. एकुणंच या पावसाने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, अनेक लघु तळावा, प्रकल्प, बंधारे भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणचे बंधारे निकृष्ठ पद्धतीने करण्यात आल्याने बांध फुटून शेतकर्यांना नुकसानदायक ठरत आहेत. 

हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय मार्ग ४ तास ठप्प


हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने ४ तास वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे नागरिकांना आपल्या गावी जाताना मोठी अडचण झाली. यापूर्वी नाल्याचे बेशरम काढून पुराचा धोका टाळावा अशी मागणी नांदेड न्यूज लाईव्हने बातमी प्रकाशित करून केली होती. मात्र याकडे नगरपंचायतीने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आणि राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारने पुलाचे काम न करता पलायन केल्यामुळे आज पूर आल्याने परिसरातील घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. एकूणच शहरात नेहरू नगर, कृर्षी अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रासह ठिकठिकाणी पाणी साचून तळ्याचे सुस्वरूप आले असून, शहरात केलेल्या कोट्यवधींचा हाच विकास होय का..? असा सवाल या पावसामुळे अनेकांना पडला आहे. 


दरम्यान नेहरू नगर येथील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हिमायतनगर नगरपंचायतने पावसाळ्यापूर्वी हिमायतनगर शहारालगत असलेल्या नालीमधील, गाळ,बेशरम काढले असते आणि नाल्याची व्यवस्थित कामे केली गेली असती तर ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया नेहरू नगर भागातील महिलामंडळींनी दिली, येणाऱ्या निवडणुकीत मत मागायला येऊ द्या त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही..?असे अनेकांनी सांगितले. तर याबाबत मुख्याधिकार्यांना अनेकदा सूचना दिल्या मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने घराला पुराच्या पाण्याचा वेढा झाला आहे. आणि यामुळे सरपटणारे प्राणी घरात शिरत असल्याने रात्र
रात्र जागून काढण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया महिला पोलीस कर्मचारी कोमलताई कागणे यांनी व्यक्त केली आहे.  

पळसपूर - डोल्हारी- घारापुर - हिमायतनगर मार्ग २ तास ठप्प


हिमायतनगर शहरालगत असलेल्या नडव्याच्या नाल्यावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांना घरी परतणे अवघड झाले आहे. या नाल्याची उंची वाढून या ठिकाणी नवीन पूल उभारावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यास मंजुरी मिळाले असे राजकीय नेते सांगत असले तर मात्र अद्याप या पुलाच्या कामाला का..? सुरुवात झाली नाही असा सवाल शेतकरी, गणेशभक्त व नागरिक विचारीत आहेत. आज पळसपूर - डोल्हारी- घारापुर - हिमायतनगर, पार्डी, या पुलावर पाणी जात असल्याने तब्बल २ तास वाहतूक ठप्प झाली होती. पाणी ओसरले असले तरी नागरिकांना पूल पार करताना साखळी पद्धतीने एकमेकांना धरून रस्ता पार करावा लागला आहे. त्यामुळे तात्काळ या पुलाचे काम व्हावे अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

तालुका कृषी कार्यालय व सेतू सुविधा केंद्रास पुराचा वेढा


येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भाड्याच्या इमारतीतील तालुका कृषी कार्यालय व सेतू सुविधा केंद्राला वरील भागाकडून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वेढा झाला होता. कार्यालयासमोर टोंगळाभर पाणी साचून असल्याने नागरिकांना कामानिमित्त ये-जा करताना अडचण झाली आहे. तर या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. हा प्रकार दरवर्षी होत असतो, मात्र याकडे प्रशासनासह राजकीय नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी