शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांची कार्यशाळा
नांदेड, अनिल मादसवार| मुलं कल्पक असतात त्यांच्या मनात कुतूहल असतं. हे कुतुहल प्रगट होणे आवश्यक आहे त्यासाठी त्याला संधी द्यावी लागेल. कोपऱ्यात मागे दडून बसलेले मूल बोलतं झालं की त्याच्या विकासाचे मार्ग सुरू होतात म्हणून सगळी मुलं बोलती होतील या दृष्टीने शिक्षण अनौपचारिक करावे लागेल असे मत शिक्षणतज्ञ आणि प्रयोगशील शिक्षिका रेणू दांडेकर यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा परिषद नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने लेखक आणि समीक्षक नरहर कुरुंदकर यांच्या 90 व्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अधिकारी, उद्यमशील शिक्षक यासाठी आज येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात निर्मितीचे आकाश या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राबविलेल्या अनेक शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली.
संवादातील सहभागावर भर दिला. समोरील अनेक शिक्षकांना बोलतं करून त्यांच्या प्रयोगांची विविध घटकांवर त्यांची मते जाणून घेतली. माहिती घेतली. अध्यापन करणे म्हणजे नुसते शिकविणे नसून मुलांचं लक्ष केंद्रित करणे आवश्यक अाहे.जर आपल्याला मनापासून चांगलं काम करायचं असेल तर सोप्या गोष्टी करा. अधिकाऱ्याच्या, केंद्रप्रमुखांच्या तपासणीच्या अडचणीचा बागुलबुवा न करता त्यांना ते काम करू द्या आणि आपण आपलं मुलांना घडवण्याचं काम करावं असं सांगून त्यावेळी त्यांनी अनेक छोटे-छोटे प्रयोग करून दाखवले. वर्गाच्या पहिल्या तासिकेपासून शाळा सुटे पर्यंत मुलांना कशा पद्धतीने विद्यार्थी केंद्रीत शिक्षण देता येऊ शकते यासाठी त्यांनी उपस्थित शिक्षकांना मंचावर बोलून अनेक प्रयोग त्यांच्याकडून करून घेतले . खरं तर ही तासिका एक उत्कृष्ट प्रयोगशाळा ठरली .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. आयोजनामाची भूमिका विशद करताना नियमांच्या चौकटीत राहून आपल्याला अवकाश शोधावा लागतो. व्यवस्थित काम करताना अवकाश मिळतो ती जागा आपण शोधावी. आपण निर्मिती प्रक्रियेचा भाग आहोत आपल्या निर्माणात चैतन्य आहे आणि हे चैतन्य निर्माण करण्याचे काम आजच्या व्याख्यानातून आपल्याला मिळणार असल्याचे त्यांनी सांगून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आग्रहातून होत असलेलं हे व्याख्यान आपणा सर्वांसाठीच दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले.
पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी समारोपात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी आजच्या व्याख्यानाचा हा अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून शिक्षकांनी उद्यमशील राहावं एक जिल्ह्यामध्ये कार्यसाखळी तयार करावी. एकमेकांशी नवनवीन प्रयोगांबाबत चर्चा करावी असे सांगून शिक्षकांना आपल्या आवेशपूर्ण शैलीने प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर,प्रलोभ कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.