चला अभिमानाने उभारू राष्ट्रध्वज -NNL


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव“ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झंडा“ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे.

ध्वजसंहिता - राष्ट्रध्वज हा आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. केंद्रीय गृह विभागाच्या दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल", या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. 

या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी व त्यासाठी सातत्याने जाणिव जागृती निर्माण करावी. तसेच, प्लास्टीक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कृती आराखडा - या उपक्रमाबाबतचा ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा, रास्त भाव धान्य दुकाने, शाळा व महाविद्यालये, पोलीस, परिवहन, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आदिंसाठी मार्गदर्शक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे:-

1)       ग्रामपंचायती - सर्व ग्राम पंचायती ग्रामीण प्रसारासाठी महत्वपूर्ण माध्यम असून ग्रामपंचायतींच्या प्रमुखांबरोबर संपर्क सत्रे / चर्चासत्रे यांचे आयोजन करावे. प्रत्येक गावात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करावी. बचतगटांचा सहभाग स्थानिक शिलाई काम करणाऱ्या गटांद्वारे ध्वजांची शिलाई/निर्मिती करता येईल. विक्री / वितरण केंद्र म्हणून ग्रामपंचायत कार्यालयांचा उपयोग करुन घ्यावा. ग्रामपंचायतींद्वारे ध्वजांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येईल. ही खरेदी स्थानिक घरांच्या संख्येवर आधारित असावी. सर्व शासकीय इमारती / संस्थांवर ध्वजारोहण करावे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्यावे.

2)     आरोग्य केंद्रे, रुग्णालये + आशा सेविका - या उपक्रमात आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, उपविभागीय रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये यांचा महत्वपूर्ण सहभाग अपेक्षित आहे. संदेश वहन साहित्य - प्रसिध्दी पत्रके, उभे फलक, बॅनर्स इत्यादी स्थानिक भाषेत ठळकपणे प्रदर्शित करावेत. प्रसुतिगृहातील सहाय्यक परिचारिकांना तिरंग्याची माहिती असलेल्या पुस्तिका (फ्लिप बुक्स) यांचे वाटप करावे. रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षामध्ये डिजिटल पडदे लावावेत. ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करावी. तिरंगा ध्वजगीत लावावे. आजादी का अमृत महोत्सव इ. बाबतचे चित्रपट दाखवावेत.

3)     रास्त भाव धान्य दुकाने (वाजवी किंमतीची दुकाने) - रास्त भाव दुकानांनी ध्वज वितरण विक्री केंद्र म्हणून काम पाहावे. या दुकानांमध्ये आणि त्याच्या सभोवताली पूर्व ध्वनीमुद्रित संदेश, सांगितिक जाहिराती (जिंगल), राष्ट्रध्वजावरील माहिती माईकवर प्रसारित करावी.

4)   शाळा आणि महाविद्यालये - शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत जाणीव-जागृती करणे. या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा. राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने / शिबिरे / चर्चासत्र इत्यादींचे आयोजन करावे. #hargharjhanda या हॅशटॅगखाली समाज माध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करावीत. राज्य/जिल्हा/शाळेचा उल्लेख करुन सोशल मीडियावर फोटो शेअर करावेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व पालकांना विशेष दैनंदिन सूचना पत्रे, पत्रके वितरित करावीत. “हर घर झंडा” विषयी माहिती देण्यासाठी पालक शिक्षक सभांचे आयोजन करावे.

5)    पोलीस - पोलीस महासंचालकांद्वारे “हर घर झंडा” या कार्यक्रमाबाबत विशेष बैठकांचे आयोजन करावे. विशेष तिरंगा मानवंदना संचलने आयोजित करावीत. “हर घर झंडा” या कार्यक्रमाविषयी प्रचार प्रसार व जागरुकतेसाठी प्रचार साहित्य, पत्रिका व इतर साहित्य वितरीत करावे. पथनाट्यांद्वारे “तिरंग्याची आण-बाण-शान” या संकल्पनेचा प्रसार करण्यात यावा. पोलिस स्टेशन परिसरात फलक, प्रसिध्दीपत्रके, उभे फलक (स्टॅंडी) लावणे व ध्वजारोहण करावे. पोलिस वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वसाहतीमध्ये / घरी ध्वजारोहण करावे. प्रत्येक पोलीस तपासणी नाक्यावर तिरंगा ध्वजाची प्रसिध्दीपत्रके लावावी.

6)     परिवहन सुविधा - राज्य परिवहनच्या बसेस “हर घर झंडा” याच्या संदेशाने रंगविल्या जाव्यात. पथकर व तपासणी नाक्यांच्या माध्यमातून हर घर झंडा या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व जागरुकता निर्माण करण्यासाठी माहिती पुस्तिका, प्रसिध्दी पत्रके इ. वितरित करावीत. अंतरसंपर्क (इंटरकॉम) आणि ध्वनीचित्रमुद्रण (व्हिडिओ) प्रणालीद्वारे राज्यांतर्गत प्रवासी बसेसमध्ये सांगितिक जाहिराती (जिंगल्स), ध्वनीमुद्रित ध्वजगीत वाजविणे, ध्वज संबंधित चित्रफित दाखविणे.

7)    प्रसार माध्यमे संकेतस्थळ, भिंतीचित्रे इ. - राज्य सरकारच्या सर्व संकेतस्थळांवर अमृत महोत्सव संकेतस्थळ (amritmahotsav.nic.in) हर घर झंड्याचा दुवा जोडावा. राज्य आणि जिल्हा स्तरावरील कृती आराखड्याबद्दल प्रसार माध्यमांना विशेष माहिती द्यावी. ध्वज निर्मिती, वितरण, देशभक्ती यांच्याशी संबंधित असलेल्या स्वारस्यपूर्ण कथा निर्माण कराव्यात.  सर्व सार्वजनिक बदलीच्या ठिकाणी भिंतीचित्रे (वॉल पेंटिंग्ज) निर्माण करावीत.

8)    महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत - सर्व महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत या नागरी भागातील प्रसारासाठी महत्वपूर्ण माध्यम आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतच्या प्रशासकीय प्रमुखांनी संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय करून संपर्क सत्रे / चर्चासत्रांचे आयोजन करावे. प्रत्येक वॉर्डात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करावी. स्थानिक शिलाई काम करणाऱ्या बचत गटांद्वारे ध्वजांची शिलाई/ निर्मिती करता येईल. विक्री / वितरण केंद्र म्हणून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयांचा उपयोग करून घ्यावा. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या आस्थापनांना ध्वजांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येईल. 

ही खरेदी स्थानिक घरांच्या संख्येवर आधारीत असावी. महानगरपालिका / नगरपालिकांच्या रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षांमध्ये डिजिटल पडदे लावावेत. ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करावी, तिरंगा ध्वजगीत लावावे, आजादी का अमृत महोत्सव इत्यादी बाबतचे चित्रपट दाखवावेत. राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने / शिबीरे / चर्चासत्र इत्यादींचे आयोजन करावे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी. स्वातंत्र्यप्राप्तीच्या देदिप्यमा्न इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करून शासनाच्या या उपक्रमात आबालवृद्ध सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व उत्साहाने सहभागी होऊ या. चला अभिमानाने राष्ट्रध्वज उभारूया. 

संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, बीड

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी