नांदेड| येथील महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडच्यावतीने 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या एमएचटी सीईटी 2022 या परिक्षेचा सराव करण्यासाठी ‘एमजीएमसीईएन मॉक सीईटी’ या नावाने मोबाईल अॅपचे आज दि. 22 जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने एमएचटी सीईटी तयारी चांगल्या पध्दतीने करण्यासाठी या अॅपची निर्मिती विषयतज्ञांकडून करण्यात आली आहे. या अॅपमुळे विद्यार्थ्यांचा एमएचटी सीईटी चा अभ्यास पुर्ण करण्यास मदत होणार आहे. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना शासना मार्फत घेण्यात येणार्या परिक्षेत चांगले गुण प्राप्त करण्यासाठी सोपे जाईल अशी अपेक्षा अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी व्यक्त केली. या अॅपमुळे एमएचटी सीईटीच्या एकूण 30 मॉक टेस्ट देता येणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ताबडतोब मिळणार आहे.
या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथस् या विषयांचे प्रत्येकी 10 पेपर व सविस्तर उत्तरे यामुळे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्ता कळाल्यामुळे मुख्य परिक्षेत चांगले गुण मिळवून त्यांच्या आवडीनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविणे सोपे जाणार आहे. या सर्व प्रक्रियांचा समावेश या अॅपमध्ये असल्यामुळे विद्यार्थी आपल्या आवडीनुसार व आवडत्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशित होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी साठी फायदा करून घ्यावा असे आवाहन अॅपच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाठकर यांनी केले आहे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.शिरीष कोटगीरे, अॅडमिशन विभाग प्रमुख डॉ.एस.एन.दाचावार, डॉ. महेश हरकरे, प्रो. पंडीत शिंपाळे, प्रो. हाश्मी एस.ए., डॉ. कल्पना जोंधळे, प्रो.एम.बनवसकर, डॉ. गोविंद हंबर्डे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर राहूलसिंह बिसेन यांनी आदींच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.