नांदेड, अनिल मादसवार| मराठवाडा विभागात दि.०५ पासून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिल्यानंतर दोन दिवसापासून शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नांदेड शहराला तर पावसाने झोडपून काढल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती.
सोमवारपासून मुसळधार तथा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात मराठवाड्यात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली आहे. मंगळवार पासूनच रिमझिम सुरू झालेल्या पावसाने दिवसभर संततधार सुरू ठेवल्यामुळे मृग नक्षत्र लागल्यानंतर प्रदीर्घ काळानंतर दमदार पाऊस होत आहे. आज सकाळपर्यंत जिल्ह्यातील नांदेड, लोहा, हिमायतनगर आदी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. रात्रीपासून वृत्त लिहीपर्यंत पावसाचॆ संततधार सुरूच असून, या भिज पावसाने पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पावसापूर्वी शहरावर काळ्या कुट्ट ढगांनी आक्रमण केले होते. त्यामुळे जणू ढगांची गर्दी शहरातील उंच घराणं स्पर्श करू लागल्याचा भास अनेकांना झाला आहे.
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.60 मि.मी. पाऊस
नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 8 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 255 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक पाऊस लोहा, हिमायतनगर परिसरात झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवार 8 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 13.30 (269.10), बिलोली-5 (193.50), मुखेड- 28 (306.50), कंधार-10.20 (332), लोहा-15.10 (261.60), हदगाव-11.20 (198.60), भोकर- 3.40 (195), देगलूर-24.70 (301), किनवट-8.50 (269.30), मुदखेड- 4.70 (319.90), हिमायतनगर-13.70 (328.90), माहूर- 7.10 (191.50), धर्माबाद- 2.30 (205.20), उमरी- 3.50 (259.40), अर्धापूर- 3.20 (201.50), नायगाव- 8.20 (185.30) मिलीमीटर आहे.
अनेक तालुक्यातील रस्त्याची कामे सुरु आहेत, यामुळे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने तसेच नाल्याच्या काठावरील जमिनीत पाणी शिरल्याने कट्टे फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे.