मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'सुंदर माझे कार्यालय अभियान' पुरस्काराचे वितरण

'सुंदर माझे कार्यालय' उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पंढरपूर|
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला  'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात हा उपक्रम कार्यक्षमपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित 'सुंदर माझे कार्यालय अभियान' अंतर्गत विजेत्या कार्यालयास पारितोषिक वितरणाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार तानाजी सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक,   जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची  कार्यक्षमता वाढते. याचा फायदा प्रशासनाला आणि सामान्य जनतेला होतो, यामुळे प्रशासनाचे काम सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये  प्रशासनाची  सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.

शासनाचे धोरणात्मक निर्णय समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी  महसूल विभागाची आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महसूल विभाग कार्यक्षम असला पाहिजे. शासनाची अनुकूल प्रतिमा निर्माण करण्यासाठी दैनंदिन कामकाजात गतिमानता आली पाहिजे. शासन आणि प्रशासन सोबत मिळून काम केल्यास राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, राज्य प्रगतीपथावर जाईल, असे श्री.शिंदे म्हणाले. 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरेल.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले,  जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 15 फेब्रवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी यावर अधिक भर दिला. स्पर्धेमध्ये 308 तलाठी कार्यालये, 80 मंडळ अधिकारी आणि 12 तहसील कार्यालये सहभागी झाली होती. या अभियानामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये सकारात्मकता येऊन 125 तलाठी सजामध्ये 90 टक्के ई-पीक पाहणी पूर्ण झाली. 499 तलाठी सजामध्ये 100 टक्के सातबारा वाटप, 26 मंडळ अधिकारीस्तरावर 80 टक्के वसुली झाली. 

यातून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवेचा लाभ मिळाला. तसेच लोकसहभागही लाभला. लोकसहभागातून 7 तलाठी आणि 3 मंडळ अधिकारी कार्यालयांचे नव्याने बांधकाम केले. मोडकळीस आलेल्या 33 तलाठी व 8 मंडळ अधिकारी कार्यालयाचेही बांधकाम केले. कार्यालयात सोयी-सुविधा, स्वच्छता असल्याने नागरिक, कर्मचारी  समाधान व्यक्त करीत आहेत. त्यामुळे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरेल, असा विश्वास श्री.शंभरकर यांनी व्यक्त केला.

पुरस्कारप्राप्त कार्यालये

■ तलाठी कार्यालय प्रथम क्रमांक रत्नदिप माने, तलाठी सजा, वडाळा, ता. उत्तर सोलापूर, द्वितीय क्रमांक दीपक ठेंगील, तलाठी सजा, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर, तृतीय क्रमांक प्रिती काळे, तलाठी सजा, वेणेगाव, ता. माढा, चतुर्थ क्रमांक खंडू गायकवाड, तलाठी सजा पुळूज, तालुका पंढरपूर.

■ मंडळ अधिकारी कार्यालय -प्रथम क्रमांक सुजित शेळवणे, मंडळ अधिकारी कार्यालय, लऊळ, ता. माढा. द्वितीय क्रमांक-  चंदू भोसले, मंडळ अधिकारी कार्यालय, अकलूज, ता. माळशिरस आणि तृतीय क्रमांक रवींद्र शिंदे, मंडळ अधिकारी कार्यालय, भाळवणी, तालुका पंढरपूर.

■ तहसील कार्यालय: प्रथम क्रमांक जगदीश निंबाळकर, तहसीलदार, तहसील कार्यालय माळशिरस तसेच अभिजीत पाटील, तहसीलदार, तहसील कार्यालय सांगोला आणि अमोल कुंभार, तहसीलदार, दक्षिण सोलापूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, सुमीत शिंदे, हेमंत निकम, चारुशिला देशमुख, संबंधित तहसीलदार उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी