कृषि दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये होणार शेती आणि शेतकऱ्यांचा जागर - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे -NNL


नांदेड।
संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांकडे मोठ्या गौरवाने पाहिले जाते. कृषिक्षेत्राशी निगडीत निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या आव्हानातून स्वत:ला सावरत शेतीला सावरण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेतकऱ्यांनी समर्थपणे पेलवली आहे. त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा, श्रमाचा यथोचित गौरव होण्यासमवेत नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचा जागर करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने घेतला आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या शाळेत शिकणाऱ्या नव्या पिढीला शेतीविषयी अधिक लळा लागावा, आवड उत्पन्न व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहय्याने प्रगतशील शेतीचा मंत्र त्यांच्या मनात रुजावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.


या अभिनव उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातील काही निवडक गावात वृक्ष लागवडीचे उद्दीष्टही देण्यात आले आहे. याचबरोबर पाण्याचे मोल लक्षात यावे यासाठी जलपूजन, पाणी बचतीसाठी व जमिनीत मुरविण्यासाठी पूर्नभरण, आपल्याच शेतात उत्पादित झालेल्या गुणवत्तापूर्ण बियांणांना बाजूला काढून पेरणीपूर्वी त्याची तपासणी करण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेली बीज प्रक्रिया, बीबीएफ पद्धतीने पेरणी आदी बाबत माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली शेती आणि आपला गाव याविषयी आत्मविश्वास वृद्धींगत व्हावा यादृष्टीने शाळांमध्ये शेतीशी निगडीत माहिती पोहचवली जाणार आहे. यात आपल्या राज्यातील पिके, जिल्ह्यातील पिके, हरितक्रांतीतून साधलेली स्वयंपूर्ण: गळीत धान्याच्या उत्पादनासाठी स्वावलंबी बाणा, सोयाबीन लागवड, कापसा ऐवजी इतर पिकांवर शेतकऱ्यांचा वाढलेला कल, वृक्षलागवड, शेतीतील अर्थकारण, फळे, दूध, भाजीपाला याबाबत सजगता आदी विषयाची ठळक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी