नांदेड | वटपौर्णिमेच्या औचित्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी आवाहन केल्यानुसार जिल्ह्यातील शाळांचे परिसर, अंगणवाडी परिसर, आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वडाचे झाड रोपण करण्यात आले.
प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील जिल्हा परिषद शाळा ,अंगणवाडी परिसर आणि मंदिर परिसरात एकूण 4 झाडे लावली. यावेळी त्यांनी सीडबॉल प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांकडून समजून घेतले.यावेळी सोबत गटशिक्षण अधिकारी रुस्तूम आडे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास ढवळे ,केंद्रप्रमुख विजय धोंडगे,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तकांचे प्रातिनिधिक वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचा परिसर स्वच्छ आणि भरपूर झाडे लावून त्याचे संगोपन केल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
जिल्ह्यातील 3739 शाळांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या व्यापक प्रमाणावर आज घेण्यात आला. शाळांची मोठी मैदाने, गावातील परिसर ,अंगणवाडी परिसर, मंदिराचा परिसर आदी ठिकाणी वडाची झाडे लावण्यात आली. शाळांमधील मुख्याध्यापक ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सरपंच,पालक आणि ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला.