कोरोना संकटकाळात शेतकरी बांधवांमुळे अर्थव्यवस्थेला ताकद मिळाली. त्यामुळे कृषी क्षेत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. कृषिप्रधान संस्कृतीचा शेतकरी हा कणा आहे. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यस्थेचा शेतकरी आधार आहे. मात्र सर्वांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या शेतकरी बांधवांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची शासनाने काळजी घेतली आहे. कृषी विभाग आता शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे वाण मोफत देणार आहे. यामुळे पोषणमूल्यांची गरज भागण्यास मदत होणार आहे. ‘आत्मांतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना सन 2022-23’ च्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य ठरले आहे.
विषमुक्त सुरक्षित अन्न - शेतकरी कुटुंबाला भाजीपाला, कडधान्य बीयाणे कीट पुरवठा करून त्यांची लागवड केल्यास त्यातून येणाऱ्या पोषणमूल्यांची गरज भागविता येऊ शकते. पोषणमूल्य असणाऱ्या वाणांची लागवड करून त्यातून येणाऱ्या भाज्या, कडधान्यांचा शेतकरी कुटुंबाने स्वत:च्या आहारात वापर करायचा आहे. आपण स्वत: लागवड केलेल्या शेतात किड रोगांसाठीच्या विषारी औषध फवारण्याचे प्रमाण मर्यादित ठेऊन किंवा पूर्णता टाळून विषमुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकते.
लाभार्थ्यांची निवड - शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना पोषणयुक्त व सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, संतुलित अन्नाचा पुरवठा करणे, विषमुक्त सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, ग्रामीण भागातील पोषणमूल्याअभावी होणारे कुपोषण कमी करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. सुरूवातीला प्रत्येक गावात 10 किट देण्यात येणार आहेत. त्यांनतर टप्प्याटप्प्याने कीट देण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. डीपीसी, सीएसआर, पंचायत समिती सेस, जिल्हा परिषद सेस, फलोत्पादन विभागाची परसबाग योजना यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. आत्माचे प्रकल्प संचालक यासाठी प्रयत्नशिल आहेत.
या योजनेसाठी 50 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून गावातील कुपोषित बालके असलेल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गावातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून उर्वरित लाभार्थी आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट,महिला बचत गटातील असणार आहेत. ग्राम कृषी विकास समितीच्या मान्यतेने लाभार्थी अंतिम करण्यात येणार आहेत.
बियाणे - भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर या बियाणांचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. हे बियाण्यांचे किट एक गुंठ्यासाठी पुरेसे असून एका शेतकरी कुटुंबाची दैनंदिन गरज भागू शकणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे बँक तयार करून स्वत: वापरून इतरांनाही बियाणे द्यावयाचे आहेत. या बियाणांच्या लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी येणाऱ्या बिया पुढच्या वर्षी वापरायचा आहेत. या बीयाण्यांचा पुरवठा महाबीज करणार असून गुणवत्तेची जबाबदारी महाबीजची आहे.
अशी करावी लागवड - या बियाण्यांच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जागा निवडावी. जागा शक्यतो राहत्या घराजवळ जागा असावी, जणेकरून देखरेख करणे सोईचे होईल. लागवड करताना मशागत करून माती भुसभुशीत करून शेणखत टाकावे. पालेभाज्यांसाठी गादी वाफे तयार करावेत. फळभाज्यांसाठी सरीवरंबे, हंगामानुसार येणाऱ्या पिकांची लागवड करावी. भाजापाल्याचे आहारातील महत्व, लागवड, जोपासना, कीड व रोग, बीयाणे बँक यासाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे पोषणमान उंचावणार असून शेतकरी कुटुंब रोगमुक्त जीवन जगू शकणार आहे.
अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षितता - शेतकरी कुटुंबाच्या अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षितताही महत्वाची आहे. आहारात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी आवश्यक पोषणमुल्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कुपोषण हे अन्न कमतरतेमुळे नसून पोषणमूल्यांच्या अभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. पोषणमूल्यांच्या अभावी लहान मुलांमध्ये तसेच महिलांमध्ये रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते. त्यामुळे ॲनिमियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. पोषण मूल्यांच्या कमी सेवनामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाढ खुंटण्यासारखे गंभीर परिणाम दिसून आल्याचे अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे रोजच्या आहारात कडधान्य, भाज्या असणे आवश्यक आहे.
...सागरकुमार कांबळे, सहायक संचालक(माहिती)