नांदेड। जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.यु.बोधनकर यांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 लहान अंतर्गत मौजे बेलसर येथे भेट देऊन जिल्हा परिषदेमार्फत गाव तेथे खोडा योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या खोड्याची पाहणी केली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांनी बेलसर गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी सदर खोड्याचा उपयोग दैनंदिन पशू उपचारांसाठी व लसीकरणासाठी होत असल्याचे सांगून याबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 लहान येथे भेट देऊन दवाखान्याच्या तांत्रिक कामकाजाची तपासणी केली. यावेळी गावातील सरपंच इंगळे व पशुधन विकास अधिकारी डॉ. बिराजदार हे उपस्थित होते. दवाखान्याच्या कामकाजाबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी मौजे लहान येथील मदर डेरी च्या दूध संकलन केंद्रास भेट देऊन तेथील जमलेल्या पशुपालकांना हॅलो विदर्भ मराठवाडा दूध विकास योजनेतील विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घेऊन आपले दूध मदर डेअरीच्या दूध संकलन केंद्रांना टाकण्याचे आवाहन केले. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्याचा हौद व खोडा यावर पत्राचा शेड लोकसहभागातून उपलब्ध करून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. सरपंच इंगळे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.