पत्रकारिता समाजाधिष्ठीत असावी : विक्रम गोखले -NNL

शहरात पत्रकार भवन उभारू : राजेश पाटील

ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात


पिंपरी/पुणे।
पत्रकारिता आणि राजकारण समाजाधिष्ठीत असावे. आदर्श पत्रकारीतेच्या जवळ जाणारी अनेक माणसं होऊन गेली. परंतु सध्याच्या तरुण पत्रकार पिढीचा अभ्यास नाही आणि पत्रकारीतेत अभ्यासाला पर्याय नाही. लोकांना शहाणं करून सोडण्यासाठी पत्रकारिता निर्माण झाली आहे. त्यामुळेच लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. वार्तांकन करताना समोरील सद्यपरिस्थिती सांगावी. तुम्हाला काय वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता अशी परिस्थिती सध्या आहे.  विशिष्ट राजकीय विचाराला वाहून घेतलेले एक वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी यांच्या नादी किती लागायचं आणि आपला कणा  ताठ ठेवायचा का नाही हे ठरवण्याची वेळ पत्रकारितेत आली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांनी पिंपरी येथे केले.

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना विक्रम गोखले यांच्या हस्ते "जीवनगौरव पुरस्कार" देवून सन्मानित करण्यात आले.

शनिवारी पिंपरीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे, ऍड. असीम सरोदे, पुरस्कारार्थी एस. एम. देशमुख, शोभना देशमुख, परीषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी  पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सोशल मीडियाचे अध्यक्ष सुरज साळवे, ज्येष्ठ सल्लागार अरुण उर्फ नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, डि. के. वळसे, रोहित खर्गे, सुनील जगताप, सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बानेवार, छायाचित्रकार मार्गदर्शक देवदत्त कशाळीकर, व्हिडीओग्राफर मार्गदर्शक गुरुदास भोंडवे, आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे पहिल्या सत्रातील कार्यशाळेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या सत्रात एस. एम. देशमुख यांचा विक्रम गोखले यांच्या हस्ते मानपत्र, शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शोभना देशमुख यांचा शबनम सैयद, माधुरी कोराड, श्रावणी कामत, ऍड. सविता वडघुले, शकुंतला कांबळे यांनी साडी देवून सन्मान केला.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे पिंपरी चिंचवड शहरात एक पत्रकार भवन उभारण्याचा प्रयत्न आहे. याविषयी योग्य ती कार्यवाही करू. पिंपरी चिंचवड शहराला राजकीय, सांस्कृतिक, मार्गदर्शन करण्यामध्ये तसेच चांगले उपक्रम नागरिकांपर्यंत पोहचवण्यामध्ये पत्रकारांचे मोठे योगदान आहे.  महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा वाढविण्यामध्ये राज्यातील पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे. अग्निपथ मधील विक्रम गोखले यांची भूमिका मला मानसिक तसेच नैतिक  पाठबळ वाढवणारी आणि प्रेरणा देणारी वाटली.  पत्रकार संघाचा हा उपक्रम उत्तम असल्याचे प्रतिपादनही आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर म्हणाले की, छायाचित्रकाराची एखादी प्रतिमा एखाद्या देशाला, जगाला योग्य दिशा देण्याचे काम करते.  त्यांनी सोमाली येथील दुष्काळ, भोपाळ येथील वायू दुर्घटना, मुंबई पुण्यासारख्या महानगरातील सफाई कामगारांचे प्रश्न, कामाठीपुरा तसेच बुधवार पेठ येथील वेश्यांचे प्रश्न, कोरोना महामारी या काळात छायाचित्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची माहिती स्लाईड शो द्वारे सादर केली. छायाचित्रकाराने समोर घडणारा प्रसंग योग्य पद्धतीने योग्य माध्यमातून नागरिकांनी पुढे आणण्याचे काम करावे. पद्मश्री छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांनी मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न छायाचित्रांद्वारे मांडल्यामुळे या सफाई कामगारांकडे "माणूस" म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारला धोरणे आखावी लागली अशीही माहिती कशाळीकर यांनी यावेळी दिली.

ऍड. असीम सरोदे म्हणाले की, पत्रकारांनी एखाद्या बातमीमुळे आपल्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. एखादा पत्रकार चुकल्यास त्यांनी मनापासून माफी देखील मागावी. समाजात घडणाऱ्या घटनांचा प्रभाव पत्रकारांवर पडतो आणि त्याचे पडसाद त्याच्या बातमीत दिसतात. एखाद्या गुन्ह्याशी संबंधित बातमीचे वृत्तांकन करताना "आरोपी" ऐवजी "संशयित आरोपी" असा उल्लेख करावा असेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आरोप सिद्ध होत नाही तो पर्यंत तो संशयित आरोपी असतो. घटनेची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय बातमी देवू नये.

सत्काराला उत्तर देताना एस. एम. देशमुख म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक पत्रकारांना गृहीत धरतात. पत्रकारांनी सचोटीने, प्रामाणिकपणे, निरपेक्ष आणि निष्पक्ष काम करावे असे सांगितले जाते. मात्र, पत्रकारांच्या अडचणी, प्रश्न यांच्यावर साधा विचारही कोणी करोत नाही. पत्रकार देखील सर्वसामान्य व्यक्तींसारखाच कौटुंबिक, आर्थिक बाबतीत त्रासलेले असू शकतो, याची जाण समाजाने ठेवावी एवढीच अपेक्षा आहे. स्वागत अनिल वडघुले, प्रास्ताविक बाळासाहेब ढसाळ, सूत्रसंचालन संदीप साकोरे, आभार नाना कांबळे यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी