श्री ज्योतिष संशोधन केंद्राचा उपक्रम; संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी उपस्थित राहणार
पुणे। श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे पुणे शहरात ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन टिळक स्मारक मंदिर येथे ८ व ९ जून २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे.
अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिष विषयक भरगच्च विचारांची रेलचेल असणार आहे. मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरणही केले जाणार आहे. अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिजित प्रतिष्ठान, दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई व प्रा.रमणलाल शहा सर्च ॲण्ड रिसर्च ज्योतिष सेंटर, सातारा यांचे सहकार्य या अधिवेशनाला लाभत असून संपूर्ण महाराष्ट्रातील दहा ज्योतिष संस्थांचा सक्रिय सहभाग यात आहे.
ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची भूमिका श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासह आनंद दवे ( अध्यक्ष हिंदू महासंघ ),सुनील पुरोहित (अभिजित प्रतिष्ठान ), आदी मान्यवर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
दोन दिवस भरगच्च वैचारिक संवाद - दि. ८ जून रोजी सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक येथील पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत दादा शेवाळे, स्वागताध्यक्षा म्हणून ज्योतिषाचार्या सौ.गौरी केंजळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रमणलाल शहा,सातारा, रविंद्र जोशी, जळगाव, ज्योतिर्विद सुनील पुरोहित, मुंबई, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिषाचार्य अनिल चांडवडकर, परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहतील. यानंतर सकाळ व दुपारच्या सत्रांमध्ये ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मान्यवर उपस्थित ज्योतिषप्रेमींना मार्गदर्शन करतील. सायंकाळी खेळ व गंमतीजमतीसह चर्चासत्र देखील संपन्न होईल.
ग्रंथ प्रकाशन सोहळा - दि. ८ जून २०२२ रोजी आयोजक श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांचा वाढदिवस त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे साजरा करण्यात येईल. त्यामध्ये त्यांचा ‘ज्योतिष क्षेत्रातील प्रवास व योगदान’ या विषयावर ॲड.सौ. सुनिता पागे या मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर लोकसंग्रह, प्रतिक्रिया व शुभेच्छांची एक चलत चित्रफित प्रदर्शित करण्यात येईल व त्यानंतर डॉ.सौ. ज्योती जोशी यांच्या हिंदी भाषेतील अनुवादित तीन ज्योतिष विषयावरील पुस्तकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल.
ज्योतिश्री पुरस्कार प्रदान सोहळा - दि. ९ जून २०२२ रोजी म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाने होईल. दुपारच्या सत्रात काही मान्यवरांना ज्योतिष क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल ज्योतिश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. त्यामध्ये चंद्रकांत दादा शेवाळे, पुणे यांना ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार, डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे, पुणे यांना ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार, सौ. चंद्रकला जोशी, औरंगाबाद यांना ज्योतिश्री आदर्श महिला ज्योतिर्विद पुरस्कार, देवदत्त जोशी, सोलापूर यांना ज्योतिश्री पुरस्कार, भरत सटकर, पुणे यांना ज्योतिश्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल.यांनतर सायंकाळी श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने अधिवेशनाचा समारोप होईल.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन - ज्योतिष अधिवेशनाच्या दोन दिवसांमध्ये तज्ज्ञ मान्यवर उपस्थित ज्योतिषप्रेमींना विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. त्यामध्ये ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, पुणे, ज्योतिषाचार्य अनिल चांडवडकर, नाशिक, सौ. नेहा शहा, पुणे, सौ. जयश्री बेलसरे, पुणे, संजय बुधवंत, पुणे, प्राचार्य रमणलाल शहा, सातारा, श्रीमती निलम पोतदार व ऋषिकेश सेनगुप्ता, मुंबई, डॉ.सौ. ज्योती जोशी, जळगाव, डॉ. मकरंद सरदेशमुख, पुणे, ज्योतिष पंडीत विजय जकातदार, पुणे, प्रदीप पंडीत, पुणे, राजेश शर्मा, सुनील पुरोहित, मुंबई, देवव्रत बुट, नागपूर, डॉ.सौ. संजिवनी मुळ्ये, पुणे, डॉ. प्रसन्न मुळ्ये, रत्नागिरी यांचा समावेश असणार आहे. याशिवाय अधिवेशनामध्ये ‘मेदनीय ज्योतिष’ या विषयावर चर्चासत्र देखील होणार आहे. त्यामध्ये सुनील पुरोहित, मुंबई, शरद जोशी, मुंबई, सिद्धेश्वर मारटकर, पुणे, उदयराज साने, पुणे यांचा सहभाग असणार आहे.
अधिवेशनात १० संस्थांचा सहभाग - श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव तर्फे या ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर अभिजित प्रतिष्ठान दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई व प्रा.रमणलाल शहा सर्च ॲण्ड रिसर्च ज्योतिष सेंटर, सातारा यांचे अनमोल सहकार्य या अधिवेशनाला लाभत आहे. याशिवाय भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, पुणे, गौरी कैलास ज्योतिष संस्था, पुणे, बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणे, फल ज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे, भृगु ज्योतिष व वास्तु समुपदेशन केंद्र, पुणे, आयादि ज्योतिष व वास्तु संस्था, नाशिक, वेदचक्षु व्याख्यानमाला, औरंगाबाद, श्री चैतन्य अभ्यास मंडळ, रत्नागिरी, अपूर्व-यश फॉरच्युन, पुणे, महिला ज्योतिर्विद संस्था, पुणे आदी संस्थांचाही या अधिवेशनात सहभाग आहे.