हिमायतनगर तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने चातक पक्षाप्रमाणे बळीराजाचे डोळे लागले आभाळाकडे -NNL

पेरण्या लांबणीवर जाण्याच्या चिंतेने बळीराजा ग्रासला 

मृगनक्षत्रातील पाऊस झाला नसल्याने पेरण्या लांबणीवर जाण्याच्या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे, हिमायतनगर तालुक्यातील कामारी परिसरातील शेतकऱ्याचे छायाचित्र
मृगनक्षत्रातील पाऊस झाला नसल्याने पेरण्या लांबणीवर जाण्याच्या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे, हिमायतनगर तालुक्यातील कामारी परिसरातील शेतकऱ्याचे छायाचित्र

हिमायतनगर, अनिल मादसवार|
मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी म्हणावा तसा पाऊस पडत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाने युद्ध पातळीवर तयारी करून, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसावर ३० शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली. तर ७० टक्के शेतकऱ्यांची पेरणी आणि कपाशीच्या लागवड होणे बाकी आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने मृग नक्षत्र कोरडे जात असून, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असून. त्यामुळे एका चातक पक्षाप्रमाणे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागल्याचे चित्र हिमायतनगर, कामारी, जवळगाव, सह तालुका परिसरात दिसून येत आहे.

हिमायतनगर तालुक्यात ३४ हजार २०० हेक्टर जमीन पेरणी योग्य आहे. त्यापैकी सन २०२१-२२ च्या हंगामात अंदाजे ३३ हजार २०० हेक्टर जमिनीवर खरीपाची पेरणी करण्यात आली होती. यात सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून, १७ हजार २७२ हेक्टरवर शेतकर्यांनी पांढरे सोने उगविले होते. तर ११ हजार ५९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती. मात्र जुलै - ऑगस्ट, सप्टेंबर  महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६० टक्क्याहून अधिक शेतकर्यांना याचा फटका बसला. त्यामुळे तालुक्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी नागविल्या गेला. अस्मानी व त्यानंतर व्यापाऱ्याच्या सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागल्याने हिमायतनगर तालुक्यातील १० ते १५ शेतकर्यांना आत्महत्या केल्या आहेत. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून, कर्ज फिटले नसल्याने अनेकांनी शेती व्यवसाय सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखविले आहे. 

नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढू शकली नाही. पिकविलेले शेतीमालाला म्हणावा तसा भाव मिळाला नसल्याने पेरणीसाठी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही, हि बाब सर्व श्रुत आहे. उरली सुरली अशा रब्बीच्या काळातही मावळालंय, ऐन उत्पन्न हातात येत असताना अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांना पूर्णतः नुकसानीत आणले आहे. तरीसुद्धा बळीराजा नव्या उमेदीने मागील वर्षी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दर वर्षीप्रमाणे खरिपाच्या तयारीला लागला असून, पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. यंदा बहुतांश शेतकरी कपाशीला फाटा देऊन सोयाबीनच्या पेरणीला प्रथम प्राधान्य देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे. कारण गतवर्षी अतिवृष्टी आणी बोन्डआळीमुळे शेतकरी हैराण झाले होते. ती परिस्थिती यंदा येऊ नये यासाठी शेतकरी सतर्क झाल्याचे बियाणे खरेदीच्या पद्धतीवरून दिसते आहे. 

त्याच बरोबर तूर, मुग, उडीद यासह अन्य कडधान्याची पिकेही घेतली जाणार आहेत. मात्र गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनच्या बियाणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जात आहे. रासायनिक खताचे दरही गगनाला भिडले असून, खते - बियाणांची जुळवा जुळाव करण्यासाठी बैंक आणि वेळ प्रंसगी साहुकाराचे उंबरवठे झिजवावे लागत आहे. एवढे करूनही खरीपाचे उत्पन्न समाधानकारक येईल कि..? नाही याची शास्वती नसल्याने शेती वायद्याने देणे फायदेशीर राहील अश्या प्रतिक्रिया काही शेतकर्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलून दाखविल्या आहेत. काही शेतकरी संकटाचा सामना करून न डगमगता नव्या वर्षाच्या युगात शेती करन्याकडे वळला आहे. अंगाची लाही लाही होत असताना देखील तळपत्या उन्हात पावसाची प्रतीक्षा करीत पेरणीच्या तयारीला लागला आहे. जोपर्यंत दमदार पाऊस होणार नाही तोपर्यंत पेरणी करू नये अश्या सूचना कृषी विभागाने दिल्याने शेतकरी सय्यम पाळून असल्याने पेरण्या थांबल्या आहेत.

रोहिण्या कोरड्या गेल्या.. मृगाची सुरुवात तुरळक झाली; पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या लांबणार..! 

गतवर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाली, तसेच रोहीन्या व मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे वेळेवर पेराण्या आटोपल्या होत्या. मात्र यंदा रोहिण्या पूर्णपणे कोरड्या गेल्या तर मृगातील पावसाने सदा शिंपला. मात्र अजूनही म्हणावी तशी पावसाला सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या नजारा आभाळाकडे लागल्या आहेत. २२ जून पर्यंत चांगला पाऊस झाला तर खरिपाच्या पेरण्या सुरु होतील, अन्यथा या वर्षीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता शेतकरी वर्गांनी वर्तविली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी