गावोगावी पोहचावी “शिवस्वराज्य दिना” ची प्रेरणा -NNL

6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन


जच्या पवित्र दिवशी म्हणजेच 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर स्वराज्याभिषेक झाला. हा स्वराज्याभिषेक केवळ रायगड किल्ल्या पुरता मर्यादित नव्हता. हा स्वराज्याभिषेक महाराष्ट्राच्या दऱ्या-कोपऱ्यात सर्वसामान्यांच्या मनात, प्रजेच्या मनात असलेल्या आवडत्या राज्याचा स्वराज्यभिषेक होता. हा राजा प्रत्येक रयतेला आपला वाटत होता. तो त्यांच्या नि:पक्ष भूमिकेमुळे. हा राजा प्रत्येकाला आपला वाटत होता तो त्यांच्या लोकल्याणकारी दूरदृष्टीमुळे.

 

लोककल्याणकारी राज्यासाठी कटिबद्धता

रयतेला, प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपले आहे, अशी विश्वासर्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात निर्माण केली. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा असलेली लोककल्याणकारी राज्याची भूमिका व प्रेरणा राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला घेता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद सर्व एकत्र जमून आज स्वराज्याची संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत.

 

दुग्धशर्करा योग !

यावर्षी हा “शिवस्वराज्य दिन” साजरा करतांना आणखी योगायोग जुळून आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेचे हे हिरक महोत्सवी वर्षे आहे. याचबरोबर मराठवाडा मुक्तीचेही हे अमृत महोत्सवी वर्षे आहे. ग्रामीण स्वायत्ततेच्या दृष्टीने आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्यादृष्टीने त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. आजवरच्या हीरक महोत्सवी वाटचालीत आपल्या पंचायतराज व्यवस्थेने एक मैलाचा टप्पा गाठला आहे. लोकसहभागासाठी, प्रत्येक गावातील लोकांना आपली ग्रामपंचायत वाटावी, प्रत्येकाच्या विकासाचे प्रतिबिंब त्या ग्रामपंचायतीमध्ये उमटावे यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना अधिकार बहाल केले.

 

लोकसहभागातून विकास आराखडा

या अधिकारातूनच प्रत्येक ग्रामपंचायतीला विशेष महत्व आले आहे. गावच्या विकासाचा आराखडा हा लोकसहभागातून, गावातील सर्वांच्या चर्चेतून जर आखला गेला तर त्या गावात होणारे परिवर्तन हे दिर्घकाळ टिकणारे असते याचा प्रत्यय आपण घेतला आहे. कोणत्याही विकास योजनांमध्ये जो पर्यंत लोकसहभागाचे प्रतिबिंब पडत नाही तो पर्यंत त्या विकास योजनेला खरा अर्थ प्राप्त होत नाही. ही योजना माझी आहे, ही योजना माझ्या गावाच्या विकासासाठी आहे असे ज्या गावात वाटते त्या गावांमध्ये विकासाच्या योजना या अधिक जबाबदारीने पूर्ण होतात. जबाबदार लोकशाहीचे, कार्यपद्धतीचे हे द्योतक आहे.

 

प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था

राज्यातील प्रत्येक भागात, प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचावी, सर्वसामान्यांना विकासाच्या योजना मिळाव्यात यासाठी शासन धडपडत असते. ज्या उद्देशाने योजना साकारतात तोच उद्देश घेऊन शेवटच्या पातळीवर, गावपातळीवर त्याची अंमलबजावणी होणे हे सशक्त लोकशाहीचे लक्षण मानले जाते. आजच्या घडीला अनेक गावात लोकसहभागातून जलसंधारणाची, पाणलोटाची चळवळ रूजू पाहते आहे, हे त्या-त्या गावातील लोकांच्या प्रगल्भतेचे आणि जाणिवजागृतीचे प्रतिक आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ही त्या जाणिव जागृतीने झाली तर त्यातील नेमका आशय ही लोकांपर्यंत पोहचतो. हा आशय पोहचविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांची आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन, पंचायत राज व्यवस्था यासाठी कटिबद्ध आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील गण आणि गट

नांदेड जिल्ह्यात सन 2017 नुसार या त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 63 गटांची संख्या आहे. पंचायत समितीचे 126 गण आहेत तर 1 हजार 310 या ग्रामपंचायती आहेत. हीच गट आणि गण संख्या 1962 मध्ये 45 आणि 90 वर होती. लोकसंख्या वाढीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गटसंख्येत वाढ झाली. पंचायत समितीच्या गणात वाढ झाली. सन 1980 साली नांदेड जिल्ह्यात 1 हजार 185 ग्रामपंचायती होत्या. त्यात भर पडून आजच्या घडीला ही संख्या 1 हजार 310 एवढी आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक असलेली ही संख्या जिल्ह्याच्या पंचायतराज व्यवस्थेचे आपण वैभव समजले पाहिजे.

 

असा साजरा व्हावा दिन

या वैभवाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांपर्यंत शिवस्वराज्य दिनाच्यानिमित्ताने सकारात्मक लोकसहभागाची मूल्य रुजावी यादृष्टीने शासनातर्फे 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करतांना महाराष्ट्र शासनाने भगवा स्वराज्य ध्वज संहिता, शिवशक राजदंड स्वराज्य गुढी संहिता याबाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतींना पाठविण्यात आली आहे. ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेले भगवी जरी पताका असावी. हा ध्वज तीन फूट रूंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा. म्हणजे लांबी ही रूंदीपेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.

 

शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शिवशक राजदंडावर हा स्वराज ध्वज बांधून तो सकाळी 9 वा. उभारून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून याची सांगता करावी. त्याच दिवशी सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घेऊन भगवा स्वराज ध्वज सन्मानाने व्यवस्थीत घडी करून ठेवून द्यावा, असेही शासनाच्या निर्देशात स्पष्ट केले आहे.

 

-        विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी