विशेष संवाद : ‘भोजशाळेतील माता श्री वाग्देवी मंदिराच्या जागी कमाल मौला मशीद कशी ?’
मुंबई| भारतातील हजारो मंदिरे तोडून इस्लामी आक्रमकांनी त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. त्या प्रत्येक मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी हिंदूंच्या अनेक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान दिले आहे; मात्र मंदिरावरील अधिकार कधीच सोडलेला नाही. आम्हीही त्याच हिंदूंचे वंशज आहोत. हिंदूंकडून जे जे हिसकावून घेण्यात आले आहे. ते ते तुम्हाला परत द्यावे लागणार आहे.
हा आता नवीन हिंदुस्थान आहे. हिंदूंची धार्मिक स्थळे पुन्हा मिळवण्याचा संकल्प काही शतकापूर्वी झाला होता. तो प्रत्यक्षात आणण्याची कृती आता होत आहे. केवळ अयोध्येतील श्रीराममंदिर, काशीतील श्री विश्वनाथ मंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरच नव्हे, तर कुतुबमिनारसह देशभरात अशा 36 हजार मंदिरांची यादी आहे. ही बळकावलेली मंदिरे पुन्हा मिळाल्याशिवाय हिंदु थांबणार नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन 'सुदर्शन न्यूज'चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाण के यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित 'भोजशाळेतील माता श्री वाग्देवी मंदिराच्या जागी कमाल मौला मशीद कशी ?' या 'ऑनलाईन' विशेष संवादात ते बोलत होते.
यावेळी मध्य प्रदेशातील 'अखिल भारत हिंदु महासभे'चे राष्ट्रीय महासचिव श्री. देवेंद्र पांडे म्हणाले की, राजा भोज यांनी मध्यप्रदेशातील धार येथे वर्ष 1034 मध्ये स्थापन केलेले माता वाग्देवीचे (श्रीसरस्वती देवीचे) सर्वांत प्राचीन मंदिर होते. त्यावर वर्ष 1305 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नंतर 1401 मध्ये दिलावर खानाने आक्रमण केले आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मशीद उभारली. त्यानंतर महमूदने आणखी एक मशीद उभारली. ब्रिटिश राजवटीत वर्ष 1875 मध्ये मंदिराच्या ठिकाणी एका उत्खनन करतांना सापडलेली माता वाग्देवीची मूर्ती इंग्लंडमधील संग्रहालयात नेण्यात आली. आजही भारताचे ज्ञान तथा बुद्धी इंग्लंडमध्ये बंदीस्त आहे. भारत सरकार त्या विषयी पाठपुरावा करून ती मूर्ती परत आणू शकते. यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण केला पाहिजे.
यावेळी 'सनातन संस्थे'चे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, मुघलांनी अनेक मंदिरे पाडली. त्यावर हिंदूंनी लढा देऊन ती पुन्हा उभी केली; मात्र मुघल आक्रमणांनी ती पुन्हा पाडली. आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत. तसेच हिंदूंशी विश्वासघात करून काँग्रेस सरकारने तयार केलेला 'प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट 1991' हा मंदिराच्या निर्माणामध्ये अडथळा ठरत आहे. हा कायदा त्वरित हटवला पाहिजे. जिथे जिथे मंदिर तोडून मशीद बांधली, तेथे पुन्हा मंदिर उभारले गेले पाहिजे.
श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, संपर्क : 99879 66666