नांदेड| पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने डॉ. सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या नरेंद्र - देवेंद्र महोत्सवातील विसाव्या अखिल भारतीय विराट कविसंमेलनात दिलीप मोदी, सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार, ॲड. मिलिंद एकताटे, डॉ.हंसराज वैद्य यांना अत्यंत प्रतिष्ठा लाभलेल्या नांदेड भूषण पुरस्काराचे वितरण हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नुकत्याच संपन्न झालेल्या आणि भव्य प्रमाणात सजविलेल्या कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथील या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुद्वारा लंगर साहीबचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप कंदकुर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख व मिलिंद देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, भाजपा नेते बालाजी शिंदे कासारखेडेकर, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा हे यांची उपस्थिती होती.
दरम्यान नांदेडभूषण पुरस्कार वितरणापूर्वी सत्कारमूर्ती आणि मान्यवरांना ढोल ताशाच्या गजरात, तुतारी आणि पारंपरिक पद्धतीने छत्रचामरे घेऊन प्रवेशद्वारावर विशेष सन्मान करून मुख्य मंचावर सन्मानाने आमंत्रित करण्यात आले. स्वागतानंतर संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते नांदेडभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मैदानात लावलेल्या भव्य सहा स्क्रीनवर नांदेडभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मानपत्राचे वाचन आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना अतिशय देखणे स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र आणि पाच हजार रुपये रोख देऊन मान्यवरांच्या हस्ते आणि महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जमलेल्या रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पुरस्कारात मिळालेल्या पाच हजार रुपयांमध्ये आणखी सोळा हजार रुपये टाकून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी राबवत असलेल्या लायन्सचा डबा या उपक्रमासाठी निधी देऊन दिलीप मोदी व सरदार नवनिहालसिंह जहागीरदार यांनी उपक्रमांचे कौतुक केले. नांदेडभूषण पुरस्कारासाठी मिळालेली प्रतिष्ठा खूप मोठी असल्याने अनेक दिग्गजांचे प्रस्ताव पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानकडे प्राप्त झाले होते.
अत्यंत देखण्या झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार अभंगे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रसिका श्रोत्यांनी विसाव्या अखिल भारतीय विराट हिंदी कवी संमेलनाचा आनंद घेतला. नांदेड भूषण पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सत्कारमूर्तीनी प्रतिपादन केले. चार वर्षापासून प्रलंबित असलेले नांदेड भूषण पुरस्कार देण्यासाठी दिलीप ठाकूर यांना सहकार्य केल्याबद्दल डॉ. सचिन उमरेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.