नांदेड| रखरखत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हाताने चपला घालण्याचा चरणसेवा हा नवीन उपक्रम धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुरु केला असून, पहिल्याच दिवशी अनेक वाटसरूंना चपला वाटप करण्यात आल्या.
दयानंद कॉलेज लातूरचे सेवानिवृत्त प्राचार्य आत्माराम पळणीटकर यांच्या डोक्यात अनेक वर्षापासून असा उपक्रम सुरू करण्याचा मानस होता. पण योग्य व्यक्ती सापडत नव्हती. एकोणिसाव्या अमरनाथ यात्रेसाठी त्यांनी दिलीप ठाकूर यांच्याकडे नोंदणी केली. खडतर अमरनाथ यात्रा सुखकर व्हावी यासाठी दररोज यात्रेकरूंचा पायी चालण्याचा सराव व प्राणायाम चा वर्ग दिलीप ठाकूर हे घेतात.
पळणीटकर सरांनी चरण सेवा या उपक्रमाबद्दल ठाकूर यांच्याशी चर्चा करून अंतिम रूप देण्यात आले. पळणिटकर व ठाकूर यांनी आठ डझन चपला विकत घेऊन हा उपक्रमाचा शुभारंभ केला. मंगळवारी अक्षय तृतीया निमित्त खा. प्रतापराव पाटील चिखलीकर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चरण सेवा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शासकीय रुग्णालय विष्णुपुरी तसेच विविध वीटभट्ट्यांवर काम करणारे कामगार रस्त्याच्या कडेला पाल टाकून राहत असलेले मजूर यांना दिलीप ठाकूर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, सविता काबरा यांनी प्रत्यक्ष जाऊन चपला दिल्या. अचानक मिळालेल्या चपला मुळे अनेकांना गलबलून आले. एक आगळा वेगळा नवीन उपक्रम सुरू केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.