कुठे आहे आज माझा गाव सांगा
कौरवांच्या रांगा कान्हा घरी
साधू संत होते निघूनिया गेले
अराजक आले देवालयी
या आणि अशा उत्तमोत्तम कवितांच्या पावसात विद्यार्थी न्हाऊन निघाले. बाहेर उन्हाचा चढता पारा आणि आत कवितांचा सुखद गारवा असे वातावरण आज भाषा संकुलात रसिक श्रोत्यांनी अनुभवले. निमित्त होते संकुलाचा 'लेखक आपल्या भेटीला' हा उपक्रम.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कवी देविदास फुलारी आणि कादंबरीकार महेश मोरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या निवडक कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलजा वाडीकर होत्या तर डॉ रमेश ढगे, डॉ. पृथ्वीराज तौर आणि डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भाषा संकुलाच्या वतीने मागील दोन दशकांपासून नियमितपणे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारतीय भाषांमधील लेखक कवींशी या उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद साधत असतात. कोरोनामुळे दोन वर्ष या उपक्रमात खंड पडला होता. या उपक्रमाचे आज दि. २ मे नव्याने सुरुवात करण्यात आली.
देवीदास फुलारी यांनी स्वतःच्या लेखनामागील प्रेरणा सांगून विद्यार्थ्यांशी मनमोकळी हितगूज केली. 'अक्षरनारायणी' या समीक्षा ग्रंथाच्या निर्मितीची हकीकत सांगताना मराठी स्त्री कवितेवर फुलारी यांनी भाष्य केले.
सरते सरिता व्याकुळती मासे
मातीचे उसासे गावभर
देवीदास फुलारी यांनी सादर केलेल्या या ओळींना रसिकांनी भरभरून दाद दिली. 'वही' या शीर्षकाची कविता देखील फुलारी यांनी यावेळी सादर केली.
कादंबरीकार महेश मोरे यांनी 'बो-याची गाठ' या कादंबरीच्या निमित्ताने समकालीन वास्तव आणि ग्रामीणसाहित्य या विषयावर मार्गदर्शन केले. 'कशी होईल ज्ञानबाराव आपली परगती?' आणि गावमातीच्या कविता त्यांनी यावेळी सादर केल्या. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शैलजा वाडीकर यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संकुलाच्या वतीने सुरू असलेल्या अन्य कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठीतील काही कविता वाचून दाखवल्या. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी अपेक्षा ही कविता सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी आगलावे यांनी केले. सुरुवातीला डॉ. पृथ्वीराज तौर यांनी प्रास्ताविक व शेवटी डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम जोगदंड, बालाजी लुटे, लक्ष्मण जाधव यांनी परिश्रम घेतले.