हजारो भक्तांच्या उपस्थिती लाभणार, 5 ते 8 जून दरम्यान धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, तीन पीठांच्या शंकराचार्यांची उपस्थिती
बासर/निझामाबाद। समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराजांच्या कृपेने व प. पू. श्री सद्गुरुदास महाराजांच्या मार्गदर्शनात ज्ञानसरस्वतीचे अधिष्ठान असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथे श्री गुरुमंदिर नागपूर प्रणित श्री नृसिंह सरस्वती आणि सायंदेव सेवा समितीच्यावतीने दि. 5 ते 8 जूनपर्यंत श्रीदत्तमंदिर भक्तार्पण व मूर्तीप्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कर्नाटकातील हंपीपीठाचे शंकराचार्य श्री विद्यारण्य भारतीस्वामी, संकेश्वरच्या करवीरपीठाचे मठाधिपती शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी, नारायण भारती पीठ कंपालीचे शंकराचार्य नारायण विद्याभारती स्वामी, हिमालयीन योगी १०४ वर्षे वयाचे श्री सदानंदगिरी महाराज व प. पू. श्री सद्गुरुदास महाराजांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
श्रीगुरुचरित्रातील 14 व्या अध्यायाचे पवित्र स्थान असलेल्या पुरातन दत्तमंदिराचा अतिशय भव्य जिर्णोद्धार करण्यात आला असून पारायण कक्ष व भक्तनिवासाचे नवनिर्माण करण्यात आले आहे. श्री दत्तधाम पारायण कक्षाचे वास्तुपूजनही यावेळी होणार आहे.
5 जून रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन सोहळयाने कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर ‘सूरनाद संध्या’ हा प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक व व्हायोलिन वादक श्रुती भावे यांचा कार्यक्रम होईल. 6 तारखेला सोमवारी काकड आरती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, उपासना या धार्मिक कार्यक्रमांनंतर नागपूरचे हभप मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी 6 वाजता हंपीपीठाच्या शंकराचा-यांच्या हस्ते ‘कल्याण’ पादुकांची स्थापना व आशीर्वचनाचा कार्यक्रम होईल व त्यानंतर श्रींची नगरप्रदक्षिणा होणार आहे. मंगळवारी, 7 रोजी सकाळी 10 वाजता हभप मोहनबुवा कुबेर दुसरे कीर्तन पुष्प गुंफतील, त्यानंतर संकेश्वरपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते गोपूजन व कामधेनु स्थापना करण्यात येणार आहे.
कलादर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सद्गुरूदास महाराजांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 8 तारखेला सकाळी 9 वाजता तेलगू नाटिका, 10.45 वाजता संत दत्तगीर महाराजांच्या हस्ते कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा विधी पू.शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे. श्रीदत्तमंदिर भक्तार्पण सोहळा, संतपूजन व संत आशीर्वचनाचा कार्यक्रम होणार असून सद्गुरूदास महाराजांचे समारोपीय आशीर्वचन लाभतील. चारही दिवस मंदिरात श्रीगुरुचरित्र शृंखला पारायण केले जाणार आहे. भाविकांनी या अपूर्व सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.