अर्धापूर, निळकंठ मदने। सलग काम करणारे महावितरणचे कर्मचारी नियमितपणे सर्व कामे सुरळीत करत असतांनाही उपविभाग अभियंताच्या नाहक त्रासामुळे संपूर्ण अर्धापूर तालुक्यातील विज कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन केले असल्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अडचणीत आला असून अनेक ग्राहकांना याचा फटका बसत आहे. सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बदली करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. वरीष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे विज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.
अर्धापूर महावितरण अंतर्गत वरिष्ठ अधिकारी यांचा विज बिलवसुली करिता चालू असलेल्या प्रचंड दबावामुळे व सध्या मे महिन्यात तापमानात वाढती वीज मागणी, मान्सून पूर्व दुरूस्ती, ट्रान्सफार्मर बदलने लाईन वरील झाडे तोडणे या सर्व बाबी लक्षात न घेता वरिष्ठअधिकारी वसुली साठी तगादा लावत असल्याने दडपणाखाली, मानसिक दबावाखाली कर्मचारी आपले दैनंदिन जीवन जगत आहे.
अर्धापूर तालुक्यात दुरूस्ती साठी कुठलेही साहित्य मिळत नसल्याने मान्सून पूर्व दुरूस्ती साठी अद्याप कुठलीही व्यवस्था केली नसुन यासाठी विचारणा केली असता तुम्ही स्वत:च्या खिशातून पैसे टाकून मान्सून पूर्व दुरूस्ती करून घ्या असी उर्मट वागणूक कर्मचाऱ्यांना मिळत आहे. अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम केले असता संबंधित अधिकारी वसुली का नाही केली ग्राहक तुमचे पाहुणे आहेत का, तुम्ही स्वतःच्या खिशातून बिलभरा, तुमच्यावर कार्यवाही करतो, पगार कपात करतो, शिस्तभंगाची कारवाई करतो अशा धमक्या देत उपकार्यकारी अभियंता हे वरिष्ठांच्या नजरेत स्वतःचे उत्कृष्टत्व सिध्द करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अर्धापूर येथील उपकार्यकारी अभियंता यांची तात्काळ बदली करावी, दुरुस्तीसाठी एजन्सी द्यावी, कर्मचाऱ्यांचा दंड परत द्यावा, अर्धापूर तालुक्यातील लोकसंख्या वाढली असून त्या प्रमाणे पदभरती वाढवावी., सर्व मागण्या मान्य होईपर्यंत अर्धापूर उपविभागातील कर्मचारी काम बंद आंदोलन करत असून सदर प्रकरणी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, महावितरण प्रादेशिक विभाग औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड, परिमंडळ कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, अधीक्षक अभियंता नांदेड, तहसीलदार अर्धापूर, पोलीस निरीक्षक अर्धापूर, कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी जी.जी. सवंडकर,एल.पी. पुरी, गोविंद चोपडे, जि.के. सुवर्णकार, आर.आर डोईजड,जी.एस. अलबत्ते, जी पी इंगोले,एस एस वाघमारे, एस एस कानोडे, अब्दुल रहीम,जि.पी.कानोडे आदींसह सदर निवेदनावर ३६ जणांच्या स्वाक्षर्या आहेत.