महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने यज्ञाच्या संदर्भातील संशोधन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर -NNL

यज्ञांद्वारे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती !


मुंबई|
‘यज्ञांचा वनस्पती, तसेच हानीकारक किटाणू, जीवाणू यांवरील स्थूल स्तरावरवरील परिणामांचा अभ्यास यापूर्वी अनेकदा करण्यात आला आहे; परंतु ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या आध्यात्मिक संशोधनातून यज्ञांचा मानव, प्राणी, वनस्पती तसेच वातावरण यांवरही सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे समाज कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते १४ व्या ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सोशल फिलोसॉफी कॉन्फरन्स’ आणि ८ व्या ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ योगा अँड स्पिरिच्युअल सायन्स कॉन्फरन्स’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन हुबळी, कर्नाटक येथील ‘ईश्‍वरीय विश्‍वविद्यालया’ने केले होते.

श्री. शॉन क्लार्क यांनी या वेळी ‘यज्ञ वातावरणाची आध्यात्मिक शुद्धी करतात का ? असल्यास किती प्रमाणात ?’, हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून, श्री. क्लार्क सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वैज्ञानिक परिषदांमध्ये केलेले हे 92 वे सादरीकरण होते. श्री. क्लार्क यांनी ‘आध्यात्मिक संशोधन केंद्रा’त जानेवारी 2020 मध्ये करण्यात आलेल्या विविध 6 यज्ञांचा आध्यात्मिक (स्पंदनांच्या) स्तरावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला. यासाठी यज्ञांपूर्वी आणि यज्ञांनंतर केलेल्या विविध चाचण्यांची या वेळी विस्ताराने माहिती दिली.

पहिल्या चाचणीमध्ये यज्ञस्थळापासून 16 कि.मी. अंतरावर रहाणारे साधना करणारे आणि साधना न करणारे शेजारी यांच्या घरातील माती, पाणी आणि हवा यांचे नमुने घेतले. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाच्या साहाय्याने या नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यज्ञापूर्वी साधना न करणार्‍यांच्या घरातील तिन्ही नमुन्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात होती. सकारात्मक ऊर्जा नव्हती. 3 यज्ञ झाल्यानंतर असे आढळून आले की, साधना करणार्‍यांच्या घरातील माती, पाणी आणि हवा यांच्यातील सकारात्मकता खूप वाढली होती. याउलट साधना न करणार्‍यांच्या घरातील माती, पाणी आणि हवा यांमध्ये थोडी सकारात्मकता वाढली; मात्र माती आणि पाणी यांच्या नमुन्यांच्या तुलनेत हवेच्या नमुन्यांची यज्ञांमधून प्रक्षेपित सकारात्मकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक होती, हे विशेषत्वाने लक्षात आले. साधना करणार्‍यांच्या घरातील हवेच्या नमुन्यांमध्ये सकारात्मकतेची प्रभावळ (यज्ञापूर्वीच्या 0.54 मीटर) वाढून 15.06 मीटर झाली. ही वाढ 2688 टक्के इतकी होती.

मुंबई, वाराणसी आणि जर्मनी येथील ‘आध्यात्मिक संशोधन केंदां’ची यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतरच्या छायाचित्रांचा याच प्रकारे अभ्यास केला असता प्रत्येक यज्ञानंतर, छायाचित्रांतील सकारात्मकता वाढत गेली, तर नकारात्मकता घटत गेली, असे आढळले. जर्मनी येथील केंद्राच्या छायाचित्राच्या सकारात्मकतेमध्ये सर्वाधिक 1330 टक्के इतकी वाढ नोंद झाली. या संशोधनातून यज्ञाचा लाभ घेण्यामध्ये ‘अंतर’ ही मर्यादा नसल्याचे स्पष्ट होते.

श्री. क्लार्क म्हणाले की, यज्ञांमुळे वातावरणाचे प्रदुषण होते, हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात यज्ञामधे आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता असल्यामुळे वातावरणाची स्थुलातून आणि सूक्ष्मातून आध्यात्मिक स्तरांवर शुद्धी होते. तसेच  आपण साधना केल्यास यज्ञांमधील सकारात्मकता ग्रहण करण्याची क्षमता वाढते. तसेच त्याचा माती, पाणी आणि हवा हेही सकारात्मकतेने भारित होतात, असे दिसून आले. यावरून यज्ञातील आध्यात्मिक शक्ती जगातील आध्यात्मिक सकारात्मकता वाढवण्याचे एक शक्तीशाली माध्यम आहे, हेच स्पष्ट होते. 

समारोप करतांना श्री. क्लार्क म्हणाले की, सध्या जगभरात रज-तम प्रचंड वाढले आहे, हे ‘आध्यात्मिक प्रदुषण’ होय. याचा जगावर सूक्ष्म स्तरावर प्रतिकूल परिणाम होतो, परिणामी युद्ध, नैसर्गिक आपत्ती यांसारखी संकटे ओढवतात. यज्ञ आध्यात्मिक प्रदूषण कमी करण्याचे अद्वितीय साधन आहे; परंतु यज्ञातील सकारात्मकता ग्रहण करणे आणि ती अबाधित ठेवणे, यासाठी समाजाने सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे अन् साधना करणे महत्त्वाचे आहे.

श्री. रुपेश लक्ष्मण रेडकर, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, (संपर्क : 95615 74972)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी