सोळाव्या शतकात छत्रपतींचे मावळे मोगल सैन्याला कात्रजचा घाट दाखवत. एकविसाव्या शतकात मावळ्यांनी चक्क छत्रपतींनाच कात्रजचा घाट दाखवला. यामुळे छत्रपतींना दिल्लीच्या तख्तापासून दूर व्हावे लागले. छत्रपती संभाजी राजे यांची निवडणुकीतून माघार राज्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरेल का हा खरा प्रश्न आहे.
संभाजी राजे यांनी आपला राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राज्यसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना प्रथम पाठिंबा जाहीर केला. आता पवार साहेबांच्या मनात नेमके काय असते हे जगात कोणी ओळखू शकत नाही. पाठिंबा का दिला हे आता भविष्यात तेच कधीतरी सांगतील. पण काही अंदाज बांधता येतात. छत्रपतींची गादी मराठा समाजाचे श्रद्धास्थान आहे.
संभाजी राजेंना चाहणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे पाठिंबा जाहीर करून पवारांनी बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. दुसरीबाब महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मते आहेत. संभाजी राजेंना भाजपही विरोध करणार नाहीत.सहावी जागा राजेंच्या रूपाने विनासायास निवडून येईल, त्याचे श्रेय आपल्या पदरात पडेल या हिशोबाने त्यानी पाठिंबा जाहीर केला असावा. पाठिंबा जाहीर करताना सभागृहातील संख्या बळानुसार शिवसेना दुसरी जागा लढणार नाही असे साहेबांनी गृहीत धरले असावे. परंतु खरा राजकारणाचा डाव त्यानंतर रंगला.
उद्धव ठाकरे हे शिवसेना कार्यप्रमुख तसेच मुख्यमंत्री आहेत. त्यांची नाराजी पत्करणे सध्या कोणाच्याही हिताचे नाही. पवारांनी राजेंना पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सेना दुसरी जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आणि संभाजी राजे यांनी शिवबंधन बांधल्यास उमेदवारी देण्याचेही जाहीर केले. पवार यांच्या संभाजी राजे यांना पाठिंबा देण्याच्या योजनेला पहिला सुरुंग लावला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच! सेनेच्या या भूमिकेमुळे राजेंच्या उमेदवारीबाबत डेडलॉक निर्माण झाला आणि तो शेवट पर्यंत कायम राहिला. राजेंच्या निवडणूक लढविण्याचा घोषणेने राजकारणात चांगलीच खळबळ माजली.
राजे छत्रपतींचे वारस! त्यांना थेट विरोध करणे कोणालाही परवडणारे नव्हते. त्यात संभाजी राजेंना भाजप सरकारने राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सहा वर्षे राज्यसभेत बसवले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांच्यापासून अंतर राखून होते. शिवसेना आज जरी धर्मनिरपेक्षतेचा आव आणत असली तरी त्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही.अजूनही त्याचा ते जाहीर पुनरुच्चार करतात. त्यामुळे छत्रपतींना ते विरोध करू शकत नव्हते आणि जाहीर पाठिंबाही देऊ शकत नव्हते. छत्रपतींच्या गादीचा जनमानसात असलेला मान पाहता संभाजी राजेही कोणा एका पक्षाचा टिळा भाली लावण्यास तयार नव्हते.
संभाजी राजेंची अशी चोहोबाजूने कोंडी झालेली असताना कोल्हापूरच्या संजय पवारांची लॉटरी लागली. निवडणुकीतून माघार घेताना संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिशेने संशयाची सुई वळवली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही असा राजेंचा आरोप आहे. राजेंनी उमेदवारी मागे घेतल्याने आता निवडणूक अविरोध होण्याची अधिक शक्यता आहे. प्रश्न हा आहे की, राजेंच्या माघारीचे राज्याच्या राजकारणावर काय आणि किती परिणाम होतात. राजेंनी स्वाभिमान संघटना काढली आहे. तिचे राजकीय पक्षात रूपांतर करण्याचीही त्यांचीही तयारी आहे. त्यामुळे राजेंची आजची माघार 2024 मध्ये कोणाला माघार घायला लावते किंवा राजे आजच्या सारखे पुन्हा कात्रजच्या घाटात अडकतात हे दोन वर्षांनी कळेलच.पण आज तरी राज्यातल्या नेत्यांनी साक्षात छत्रपतींनाच कात्रजचा घाट दाखवला हे मात्र खरे!
विनायक एकबोटे, नांदेड दि. 27।5।22