डाॅ बाबासाहेब आणि त्यांची पञकारिता -NNL


वर्तमानपत्र हे समाजाच्या विकासाला   चालना देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे अशी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांना जाणीव होती. वर्तमानपत्राद्वारे अस्पृश्यांवर होणारे अन्याय व अत्याचार समाजासमोर मांडणे, स्पर्श समाजातही परिवर्तनाचा विचार उजवणे हा वर्तमानपत्र सुरू करण्या पाठीमागचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू होता. अस्पृश्यांच्या विविध चळवळीला मागील भूमिका स्पष्ट करणे व चळवळीला विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वर्तपत्राची गरज वाटत होती. 1920 सली छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या साह्यायाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचे वर्तमान वर्तपत्र सुरू केले 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. परंतु या वर्तमानपत्राला  लोकाश्रय न मिळाल्याने ते अल्पजीवी ठरले.

1928 मध्ये समता संघातर्फे समता हे पत्र सुरू केले. त्यांनी निरनिराळ्या  वर्तमानपत्रातून मांडलेल्या विचार यावरून  त्यांच्या झुंजार पत्रकारितेची जाणीव होते.  अन्याय करणाऱ्या विविध विषयांची चर्चा त्यांनी आपल्या वर्तपत्रातून केली. तसेच अस्पृश्यांना जागृत करण्याचा, संघटित करण्याचा प्रयत्नही या माध्यमातून त्यांनी केला. डाॅ. बाबासाहेबांकडे पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी अति उच्च दर्जाची पात्रता होती . उच्च कोटीचे तत्त्वज्ञान प्रकांड पंडित, गाढे अभ्यासक, समुद्राचा ठाव घेणारी विश्लेषण क्षमता याच  बरोबर भाषिक सौंदर्याचे उत्तुंग दर्शन त्यांच्या लेखनातून होते .तत्कालीन परिस्थितीत केवळ चळवळीची मुखपत्रे म्हणून त्याने वर्तमानपत्रे चालवली नाही तर त्यातून जागतिक घडामोडीचा ही आढावा त्याने घेतलेला दिसून येतो.

प्रचंड बुद्धीमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे ,महाडचा सत्याग्रह, शेतकऱ्यांचे कैवारी ,मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह ,गोलमेज परिषद, पुणे करार ,स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभा, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिला साठी कार्य सर्व क्षेत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसा जगायचं ते शिकवेल अशा विचारसरणीच्या युगप्रवर्तक महामानवास जयंतीच्या निमित्त विनम्र अभिवादन!

लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ म्हणून प्रचार-प्रसार माध्यमांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक घटकांना या प्रचार प्रसार माध्यमात प्रतिनिधीत्व मिळायला हवे अन्यथा एकतर्फी आणि असंतुलित माहितीचा प्रसार होत रहातो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. ज्या समाजाला वर्षानुवर्ष अनेक हक्क बाबी तसेच प्रतिनिधित्व पासून वंचित ठेवण्यात आले त्या समाजाने स्वतःचेच माध्यम तयार करावे जेणेकरून त्या समाजाला आपल्या समाजाच्या समस्या व दुःख सर्वांसमोर मानता येऊ शकतील असा त्यांचा ठाम विश्वास होता  म्हणूनच जो समाज आज पर्यंत मूग घेऊन गप्प होता म्हणजेच मुका होता त्या समाजाच्या व्यथा प्रश्न व विद्रोह मांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपले कार्य परखडपणे वस्तुनिष्ठपणे पार पडल्याचे दिसून येते. आपल्या पत्रकारितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवा विचार माध्यम व्यवस्थेत रुजून माध्यम व्यवस्थेच्या मदतीने सामाजिक चळवळीत वैचारिकता निर्माण केली .डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता जितकी आक्रमक होती तितकीच संयमी होती.

सामाजिक शैक्षणिक राजकीय या क्षेत्रा बरोबरच पत्रकारीता या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरु केले. मूकनायक म्हणजे मूक समाजाचा नायक अनादी काळापासून ज्या समाजावर अन्याय  होत राहिला त्या अन्यायास वाचा फोडण्याचे कार्य या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केले. अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्याची उपायोजना सांगणारे म्हणजे मूकनायक हे पाक्षिक होय .या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अन्यायग्रस्त समाजात लढण्याची वृत्ती निर्माण केली. 

मूकनायक पाक्षिकाच्या सुरवातीलाच, काय कंरू आतां धरनिया भीड । नि :शंक हें तोंड वाजविले ।। नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाणं ।सार्थक लावून नव्हे हित।। या तुकाराम महाराजांच्या ओळीतून ।डाॅ. बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिक मागील भूमिका स्पष्ट केली होती.मूकनायक पाक्षिकाने  त्यावेळी सर्वार्थाने मुक्या  असलेल्या समाजाला खर्‍या अर्थाने आवाज दिला .डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाजसुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हत्या. त्यांनी आपल्या पत्रकारितेतून माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचे,  त्याला हक्काची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. समाज व्यवस्थेने हजारो वर्षापासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायक च्या रूपाने नवा आवाज मिळाला होता.

3 एप्रिल 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या पाक्षिकाची  सुरुवात करून सामाजिक प्रश्नांच्या मांडणीस  सुरुवात केली. बहिष्कृत भारत या पाक्षिकाची बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या ओळी डॉ. बाबासाहेबांनी घेलेल्या दिसून येतात. आत कोंदड होऊनी हाती ।आरुढ रथी। देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने। जगी किर्ती रुढावी। स्वधर्माचा  मानु वाढवी ।इया भारापासोनि सोडावी। मे दिनी। आता पार्थ नि:शंक होई। या संग्राम चित्त देई ।एथ हे वाचूनि  काही ।बोलो नये । आता केवळ संग्राम ।संग्राम शिवाय दुसरेा काहीही  नाही। अशी युध्दप्रेरणा डॉ. बाबासाहेबांनी बहिष्कर भारत च्या माध्यमातून प्रारंभापासून अस्पृश्यांमध्ये चेतवली होती.तो काळ महाडच्या सत्याग्रह आंदोलनाचा होता. 

या पाक्षिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक विषय मांडून सामाजिक प्रश्नांवर समाज, शासन इत्यादींचे लक्ष वेधले .1927 मध्ये चर्चेला असलेला सर्वात मोठा विषय म्हणजे एका हिंदू स्त्रीचा मुसलमान  पुरुषासोबतच्या लग्नाचा होता .आणि त्यावेळी सर्व मराठी वर्तमानपत्रे पुणे येथून प्रकाशित होत होते. परंतु या प्रश्नावर विचार मांडण्याचे धाडस इतर वर्तमानपत्रांनी केले नाही. तेव्हा बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत या पाक्षिकातून संपादकीय लेख लिहून त्या लग्नाचे स्वागत केले आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करण्याचेही समाजाला आव्हान केले होते. या सर्व बाबी वरून हे लक्षात येते की, सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून वर्तमानपत्राकडे डॉक्टर बाबासाहेब पाहतात .याबरोबरच बाबासाहेबांनी बालविवाह, वर्णव्यवस्थेचा प्रभाव, मंदिर प्रवेश सत्याग्रह, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद ,मजूर पक्ष, सायमन कमिशन इत्यादी विषयांवर लेखन केल्याचे दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या उध्दारासाठी सुरू केलेल्या चळवळींमध्येही वर्तमान पत्राची खूप मोठी भूमिका आहे .1930 ला त्यांनी जनता नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. मूकनायक, बहिष्कृत भारत या वर्तमान पत्रांमध्ये ते प्रत्यक्ष दखल घेऊन लिखाण करायचे परंतु 1930 नंतर डॉ. बाबासाहेबांनी वृत्तपत्राची जबाबदारी आपल्या निकटवर्तीयांना सोपवली आणि सामाजिक चळवळीवर लक्ष वेधले. माणसाला माणुसकीची वागणूक देणारा मानवतावादी ,विज्ञानवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणारा धर्म 1956 मध्ये बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह स्वीकारल्यानंतर जनता वर्तमानपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे केले. धर्म कार्याला गतिमान करण्यासाठी समता, स्वातंत्र्य ,बंधुता इत्यादीची शिकवण भारतीय समाजात रुजवण्यासाठी प्रबुद्ध भारत या वर्तमानपत्राची भूमिका खूप महत्त्वाची होती.

जाहिराती विषयी म्हणजेच वर्तमानपत्रातून छापलेल्या जाणा-या जाहिराती विषयी डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांचे मत खूप वेगळे होते जाहिराती शिवाय वर्तमानपत्रे जगू शकत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानपत्राने जाहिरातीच्या आहारी जावे का ? आणि कितपत जावे ? याविषयीचा त्यांचा दृष्टीकोन खूप भिन्न होता. ते म्हणतात, "आर्थिक सवलतीसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासंबंधीचे पाळायला हवीत" जाहिरातीची उद्दिष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धत यात विरोधाभास निर्माण झाला की ते काम करण्यामागील तत्व भ्रष्ट होते असे त्यांचे स्पष्ट मत होते. " जाहिरात आणि नीतिमत्ता यांचा अनन्यसाधारण असा संबंध आहे असे डाॅ. बाबासाहेब म्हणतात. आंबेडकरांचा वर्तमानपञे अपरिहार्य व अत्यंत गरजेचा वाटतात  म्हणून समाज उन्नतीचे प्रबोधनाचे साधन म्हणून त्यांनी वर्तमानपत्राकडे बघितले होते. त्यांनी कधीही जाहिरात आणि तत्त्वे यामध्ये तडजोड केली नाही.त्यांची पत्रकारितेतील तत्त्व्रणाली प्रभावशाली होती व ते एक निष्ठावंत पत्रकार होते.

डॉ. बाबासाहेबांनी समाजातील दुःख ,अन्याय आपल्या पत्रकारितेतून जगासमोर मांडून त्यावर उपायही सांगितला आणि यासाठी वर्तमानपत्राचा प्रभावीपणे वापर केला. डॉ. बाबासाहेबांनी वर्तमानपत्रातून मांडलेले विचार भूमिका आजही समाजाला तंतोतंत लागू होतात. त्यांच्या पत्रकारितेच्या विचारातून त्यांची दूरदृष्टी व विचारांची सखोलता स्पष्ट दिसून येते. आज आम्ही वर्तनमान जीवनात  वर्तमान पत्राकडे पाहतो किंवा वर्तमान पत्रकारितेच्या वस्तुनिष्ठतेचा, समाज बांधिलकी याचा विचार करतो तेव्हा हे लक्षात येते, की वर्तमानपत्राच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ ,प्रभावी आणि  निपक्ष भूमिका मांडली जात नाही. त्याचबरोबर समाजातील प्रश्न पोटतिडकीने मांडल्या कडे पत्रकारांचा कल आढळून येत नाही प्रत्येक वर्तमानपत्रातील बातमीस पैशाच्या जोरावर प्रसिद्ध दिली जाते. तसे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नव्हते ते शुद्ध पत्रकारिता व शुद्ध समाजसेवा करणारे सच्चे पत्रकार होते.

डाॅ. सत्यभामा जाधव, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा, उपाध्यक्षा नांदेड, मो.नंबर :9403744715

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी