मुंबई| नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, या हत्येप्रकरणी गठीत झालेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित आढावा घेणार आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मंत्री अशोक चव्हाण यांची गुरुवारी दुपारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी बियाणी हत्याकांडाचा घटनाक्रम तसेच बियाणी कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा आढावा घेतला.
संजय बियाणी यांचे मारेकरी व या हत्याकांडाचे सूत्रधार लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी गृहमंत्री या नात्याने आपण या तपासाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी मंत्री श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी केली व गृहमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. संजय बियाणी यांची हत्या अतिशय गंभीर असून, त्यांचे मारेकरी कोण व या हत्येचा हेतू काय? याचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.