शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी बाबासाहेबाना केलं वंदन
हिमायतनगर, अनिल मादसवार| कोरोना महामारीतून सुटका झाल्यानंतर दि.१४ एप्रिल रोजी हिमायतनगर शहरासह तालुकाभरात भारतीय घटनेचे शिल्पकार, बौद्धीसत्व, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरासह तालुक्यात पंचशील ध्वजारोहण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची भव्य अशी मिरवणुक काढून अभिवादन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात महिला -पुरुषांनी सहभाग घेतला होता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तालुकाभरातील बौद्ध समाज बांधवानी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून निळी सलामी देत अभिवादन केले. सुरवातीला सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजरावहन शहरातील नालंदा बौद्ध विहारात करण्यात आले. त्या नंतर पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून शहरातील मुख्य रस्त्यावरून डॉ.बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यात युवकांनी डीजेच्या तालावर आणि भिमगीतांच्या सुरावर ठेका धरला होता. तर बौद्ध उपासक - उपासिका महिला, पुरुषांनी मिरवणुकीत उपस्थित होऊन भीम गीते गाऊन निळी सलामी देत शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.