उद्घाटन कादंबरीकार बाबुराव मुसळे यांच्या हस्ते होणार
नांदेड| दि. १८ एप्रिल २०२२ रोजी मराठी साहित्य संस्कार मंडळातर्फे वाकोडी ता. कळमनुरी येथे होणाऱ्या मराठी साहित्य संस्कार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन नामवंत कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते होणार आहे.
मराठी साहित्याचे संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहचावेत, त्यांच्यात रुजावेत, शालेय स्तरावरून नव्या साहित्यिकांची पिढी घडावी या उद्देशाने इसाप प्रकाशनाद्वारे संचालित मराठी साहित्य संस्कार मंडळाच्या वतीने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी साहित्य संस्कार संमेलने घेण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत वाकोडी येथे हे पहिले संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले यांची निवड करण्यात आली आहे.
शंकर वाडेवाले हे आजही प्रत्यक्षात उन्हातान्हात, पावसात, थंडीतही शेतकऱ्यांवर नेहमी अस्मानी-सुलतानी संकटांचा डोंगर कोसळलेला असतानाही काळ्या मातीत राबत असतात. शेतीची अवस्था, शेतकऱ्यांची दुर्दशा, माय-बापूंचे कष्ट, त्यांचे दुःख हे सारे काही त्यांनी पाहिले आहे. स्वतः साहिलेही आहे. ते त्यांच्या कथा, कवितांमधून अभिव्यक्त झाले आहे. त्यांचे कढवाही, आभाळमाती, माती बोले गूज, मायीचं गाणं, देहचंदनाचा, थेंब थेंब पाऊस, गाणं शिवारातल्या माणसाचं, हे कवितासंग्रह तर गुरं आणि गोठा हा कथासंग्रह तसेच वाऱ्या रे वाऱ्या, बालकवितासंग्रह व पैशाचं झाड बालकथासंग्रह, परोपकारी सुगरण, गरिबांचे कैवारी गाडगेबाबा, सानेगुरुजी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच अ. भा. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी अनेकदा आपल्या कविता सादर केल्या आहेत.
तसेच उद्घाटक म्हणून नामवंत कादंबरीकार बाबाराव मुसळे यांची निवड झाली आहे. त्यांच्या कादंबऱ्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लावण्यात आल्या आहेत. वरील दोन्ही मान्यवरांची निवड झाल्याचे या मंडळाचे संस्थापक दत्ता डांगे यांनी दि. ११ एप्रिल २०२२ रोजी आहे. या निवडीने साहित्यक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. या बैठकीस डॉ. संतोष कल्याणकर, उपसरपंच शिवाजी भवर, विजय गं. वाकडे, प्रा. राजाराम बनसकर, रविकांत कदम, पुंजाजी काकडे,एस. एस. देशमुख, प्रा. के. एस. भवर, सुभाष डाखोरे, विकास जाधव, श्रीमती ओ. बी. जाधव, पंडित नरहरे, दुर्गादास नाईक आदी उपस्थित होते.
या साहित्य संमेलनातील कविसंमेलनात ज्या कवींना स्वयंस्फूर्तपणे सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे दत्ता डांगे (संवाद संपर्क क्रमांक ९८९००९९५४१) यांचेकडे किंवा दि. १४ एप्रिल २०२२पर्यंत संदेश पाठवून नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. या संमेलनास साहित्यिक व रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन उपसरपंच शिवाजीराव भवर व वाकोडी येथील शालेय व्यवस्थापन समितीने केले आहे.