भुवनेश्वर मध्ये राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत गाठला उच्चांक
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केली. दुबई येथे झालेल्या फाजा चॅम्पियनशिप व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
परिस्थितीवर मात करून कठोर मेहनत व प्रचंड जिद्दीच्या जोरावर तिचा कीडा प्रवास सुरूच आहे ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या विसाव्या नॅशनल चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत तिने गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकाऊन दोन सुवर्णपदकांची ती मानकरी ठरली. विशेष म्हणजे या दोन्ही क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय पातळीवरचे विक्रम तिने मोडीत काढून स्वतःचा उच्चांक निर्माण करून इतिहास केला आहे. थोडा प्रवास सुरू असतानाच तिने शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नसून एम. ए. बी. एड ही पदवी संपादन करून ती सध्या कंधार येथील श्री शिवाजी लॉ कॉलेज तेथे विधी शाखेचे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे तिच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्वीकारल्या आहे.
या यशाबद्दल बोलताना भाग्यश्री म्हणाली की,आपल्या संपुर्ण क्रीडा प्रवासासाठी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, भाजप दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा हिंगोलीचे माजी नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण( बेंगलोर) बेसिक ट्रेनर श्रीमती पुष्पा मॅडम(बेंगलोर), विवांश जिमचे अनिल पाटील भालेराव, मातोश्री मुलींच्या होस्टेलचे सुधीर पाटील, संस्थेचे शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार व आमदार भाई केशवराव धोंडगे,संस्था अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम धोंडगे, प्राचार्य महेश धर्मापुरीकर,
मराठा सेवा संघ, दिव्यांग कृती समिती, साई परिवार, राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे, पोलीसचे डी.आय. शेरू मास्तर, सहाय्यक प्रशिक्षक एजाज अन्वर अहमद, सविता पतंगे व उपचार करणारे सर्व डॉक्टर, आणि माझा परिवार यांचे नेहमी सहकार्य लाभते. आगामी एशियन, वर्ल्ड चॅम्पीअनशिप व पुन्हा पॅरा ऑलिंम्पिक क्रिडा स्पर्धेत सहभागी होण्याचा माझा मानस असून त्यादृष्टीने मी प्रयत्नशील असून कठोर मेहनत घेत आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर भारताचा तिरंगा जगभरात सन्मानाने फडकविन असा मला आत्मविश्वास आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.