नांदेड| शहारामध्ये उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी एक जुलै पासून सुरू करावी. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे.
1 एप्रिल पासून नांदेड शहरात दुचाकी वाहन धारकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. यापूर्वी अनेकदा हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. पोलिसांसह अनेक शासकीय कर्मचारी देखील हेल्मेट वापरत नाहीत.सामान्य नागरिकांना हेल्मेट वापरायची सवय नाही.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश एप्रिल फुल ठरतो की काय हे लवकरच नांदेडकरांना समजेल. अचानक हेल्मेट सक्ती केल्यामुळे अनेक वाहनधारक संभ्रमात पडले आहेत. हेल्मेट वापरले नाही तर दंड भरावा लागेल. आणि जर वापरले तर घामामुळे अस्वस्थ व्हावे लागेल. उन्हाळ्यात नांदेड चे तापमान 45 डिग्री च्या जवळपास पोंहोचत असल्यामुळे हेल्मेट ची सवय नसणाऱ्या नागरिकांना उन्हाळा आणखी तापदायक वाटणार आहे.
हेल्मेट वापरणे वाहनधारकांसाठी गरजेचे असले तरी त्याची सवय असणे आवश्यक आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सध्या न करता उन्हाळा संपल्यानंतर एक जुलै पासून करण्यात यावी अशी नांदेडकरांची भावना आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय तीन महिन्यासाठी प्रलंबित ठेवावा असे दिलीप ठाकूर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्व वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.