भोकर मतदारसंघासाठी ५० लाख मंजूर
भोकर/नांदेड| अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून भोकर मतदारसंघासाठी ५० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून मंजूर केला आहे. या निधीतून दफनभूमी संरक्षण भिंत, सिमेंट रस्ते, आदी कामे करण्यात येणार आहेत. यातून अल्पसंख्यांक बहुल भागाची विकासाकडे वाटचाल होणार असल्याने ना. चव्हाणांचे अल्पसंख्यांक समाजाच्या नागरिकांनी आभार मानले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यासह भोकर मतदारसंघातील विकास कामांसाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. यातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. अल्पसंख्यांक बहुल भागाचा विविध विकास कामातून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.
यातून नांदेड जिल्ह्यासाठी ५ कोटी ६० लाख मंजूर झाले आहेत. यात भोकर मतदारसंघासाठी ५० लाख मंजूर करण्यात आले आहेत. भोकर तालुक्यातील पिंपळढव येथील दफनभूमीसाठी सिमेंट रस्ता बांधण्यासाठी १५ लाख, अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील दफनभूमी संरक्षण भिंत बांधण्यासाठी २० लाख तर मुदखेड तालुक्यातील बारड येथील दफनभूमी संरक्षण भिंत बांधण्यासाठी १५ लाख रुपयाचा निधी राज्य शासनाने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून मंजूर केला आहे.
जिल्ह्यासह भोकर मतदारसंघातील प्रलंबित असलेली विकास कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण प्रयत्नशील आहेत. भाजपा सरकारच्या काळात विशेषतः नांदेड जिल्ह्यासाठी निधी देताना हात आखडता घेतला होता. यामुळे त्यावेळी जिल्हा विकासाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ना. चव्हाणांनी विकास कामांचा धडाकाच सुरु केला आहे. मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामातून शाश्वत विकासाची पायाभरणी करताना सर्वच भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विकासाचा धडाका पाहता येणाऱ्या काळात नांदेड विकासाचे मॉडेल ठरेल असा विश्वास नांदेडकरांतून व्यक्त करण्यात येत आहे.