नांदेड| नांदेड शहरात भरदिवसा प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेला १0 दिवस लोटले असताना अद्याप पोलिसांना या खुनाचे धागेदोरे सापडत नाहीत. हि खेदाची बाब असून, या घटनेचा तपस लावण्यात पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत. नांदेड पोलीसांशी माझे कांही वैर नाही पण या घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी सुद्धा तपास लावू शकत नाही म्हणजे चिंतेचा विषय झाला आहे. आता या घटनेचा तपास लावण्यासाठी या गुन्ह्याची फाईल सीबीआय कडे वर्ग करावी , अन्यथा आगामी २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा नांदेडचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली.
ते आज नांदेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंचावर खा.प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, भाजपा प्रदेशचे एड. चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, डॉ.संतुकराव हंबर्डे, भाजपा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष एड.किशोर देशमुख, संजय बियाणीं यांचे नातेवाईक मयुर मंत्री, माणिकराव मुकदम, माधवराव उच्चेकर, प्रल्हाद बैस आदींची उपस्थिती होती. नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली. त्यास १0 दिवस झाल्यानंतरही पोलीस तपास लावण्यात अपयशी ठरली आहे. या खुनाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटीला कोणतेही धागे ढोरे हाती लागले नाहीत. उलट तपासासाठी आम्हाला अजून वेळ द्या अशी मागणी करत आहेत. यावरून एसआयटीला या गुन्ह्याचा तपास लावणे शक्य होईल असे वाटतं नाही. त्यामुळे हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा असे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना खा.चिखलीकर म्हनाले कि, नांदेड जिल्ह्यात संजय बियाणी सारखे अन्य कोणत्याही व्यक्तीची हत्या होऊ नये म्हणून तात्काळ आरोपी पकडले पाहिजे, संजय बियाणी यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिबांना घरे मिळून दिली. जवळपास ४०० ते ५०० कुटूंबियांचे त्यांनी पालकत्व स्वीकारले होते. अश्या गोर गरिबांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येचा तपास लागत नाही. या घटनेबाबत मागील काही दिवसापूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून सांगितले आहे. त्यांनी तपास करण्याबद्दल मला ग्वाही दिली आहे. या खुनाच्या गुन्ह्यात माझे नाव असेल तरीही या गुन्ह्याची गूढ उकलायला हवे. एसआयटी ज्या पद्धतीने तपास करत आहे कदाचित तो या घटनेचा धागा आहे कि नाही, याचा सुद्धा तपास लागत नाही. असे म्हणत त्यांनी नांदेड पोलीस यंत्रणेवर निशाणा साधला. जर या घटनेचा तपास सीबीआयकडे दिला नाहीतर येणाऱ्या २० एप्रिल रोजी जिल्हाधीकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, या मोर्चात भाजपासह या घटनेच्या निषेध करणाऱ्या सर्वानी सहभागी होऊन गुन्हेगारीला आळा घालण्याच्या निर्णयासाठी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी नांदेडकरांना केले.