ज्या एक दीड महिन्यात सर्वधर्मीय सण, उत्सव तथा जयंतीचे कार्यक्रम लागोपाठ येत असतात त्या कालखंडात प्रशासनाची झोपच उडालेली असते. शहरात कुठेही खट्टू झाले की लगेच सर्वचजण दक्ष होतात. परंतु होणारी कोणतीही अनुचित घटना घडून जाते आणि त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. त्या त्या घटनेवरून गांभीर्य लक्षात येते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष राहते. मिरवणूका, शोभायात्रा म्हणजेच जास्तीत जास्त गर्दी होण्याच्या संबंधाने काळजी करण्यासारखे वातावरण असते. काही मोठ्या मोठ्या घटना ज्या भूतकाळात घडलेल्या असतात, त्या आठवल्या तरी अंगावर काटा उभा राहतो अशा घटनांच्या वेळी सगळीकडून खापर पोलिस प्रशासनावर फुटलेले असते.
छोट्याशा वादातून, कुरबुरीतून मोठ्या दंगलीपर्यंत त्याचे पर्यवसान होते. संचारबंदी लागू करण्याचीही वेळ अनेकदा आलेली असते. या अशा घटना घडण्याला, चिघळण्याला आणि प्रशासनाने योग्य रीतीने परिस्थिती न हाताळल्याने झालेले मानवी नुकसान, सामाजिक असंतोष वगैरेंसाठी जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले जाते. या सगळ्या प्रकारात राजकीय नेतृत्व आपल्या पोळ्या शेकायला तयारच असते. अशा घटनांमधून प्रशासन, सर्वसामान्य जनता यांना नाहक त्रासच होतो. त्यामुळे कुठे काही वाईट घडून येऊच नये हा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
परवा रामनवमी शांततेत साजरी झाली. पोलिसांनी एका दिवसापुरता सुटकेचा निःश्वास टाकला असेल. परंतु शांतता कमिटीच्या बैठकीत एक मुसलमान बांधव म्हणाले होते की, जब रामनवमी का जुलूस निकलते वक्त रास्तेमें आनेवाली मस्जिद के सामने आते ही हमारे हिंदू भाईयों को ना जाने क्या होता है.. इतना बडा और उँचा पार्टीशन होने के बावजूद उपर चढते हैं, गुलाल, चप्पल, खाली बोतल हमारी तरफ फेकतें है| अशा घटनांचे दंगलीत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. हे पोलिस प्रशासन जाणून आहे. त्यामुळे अशावेळी मस्जिमध्ये नमाज पढण्याव्यतिरिक्त त्यांच्या गल्ल्यांमधून शोभायात्रेत येणाऱ्या रस्त्यांना बंद केले जाते. कोणत्याही परिस्थितीत हिंदू आणि मुस्लिम हे समोरासमोर येऊ नयेत. आता सध्या रमजानचे पवित्र पर्व सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडणार याची डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जाते. ही झाली रस्त्यावरची बाब. परंतु यावेळी किंवा या कालावधीत सामाजिक माध्यमातून तेढ पसरविणाऱ्या मजकूरांवरही करडी नजर ठेवली जाणे आवश्यक असते. विटंबना करणे, पोस्टर/ बॅनर फाडणे, झेंडे काढून फेकणे या कारस्थानामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना कठोर भूमिका घेणे आवश्यक असते. तशी ते घेतातही...पण प्रकरण चिघळणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सर्व चौक, महत्वाची ठिकाणं, अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती, हत्यार बाळगणारे इसम आदींचा अभ्यास करून पोलिस दलांचे पथसंचलन वगैरे करावे लागते.
दोन दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आली आहे. मोठ्या हर्षोल्हासात साजरी होणारी भीम जयंती गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ती साजरी होऊ शकली नाही. त्यामुळे आता निर्बंध संपूर्णपणे हटले आहेत. शहरात जागा मिळेल तिथे बॅनर लागले आहेत. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. सर्वत्र जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे किंवा अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचा अवलंब करावयाचा आहे. शहरात बॅनर लावून विद्रुपीकरण करण्यात येऊ नये असा नियम असला तरी जनमानसिकता लक्षात घेऊन प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर पूर्ववैमनस्यातून कुणाचे बॅनर वा पोस्टर फाडण्यावरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा आधी शुभेच्छूकांवर आधी कारवाई केली जाईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यामुळे तुम्ही लावलेले बॅनर, पोस्टर किंवा झेंडे संदर्भ काहीही असो, त्या संबंधाने त्याचे संरक्षण तुम्हीच करावयाचे आहे. तसेच डीजे वाजविण्यास, मोटारसायकल रॅली काढण्यासही बंदी घातली आहे. तेव्हा या सगळ्या कारणांमुळे काही दुर्दैवाने काही घडल्यास त्यात काही युवक अडकतात. तेव्हा त्याचे करीयर बरबाद होईल यादृष्टीने विचार करावा लागतो. याचा विचार आधी पालकांनी करायला हवा. या प्रकरणी शहरातील प्रतिष्ठित, राजकारणी लोकांचे फोन येतात. परंतु शहरात काही काळासाठी निर्माण झालेल्या अराजकतेसाठी कोण जबाबदार असते? झालेल्या गंभीर परिणामांवरुन पोलिसांवर बोट ठेवायला पुन्हा जनता मोकळीच असते असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.
आपण आपल्याच देशात आपले सण, उत्सव मोठ्या उत्साहात मोकळ्या मनाने साजरे करु शकत नाही. त्यासाठी मोठा बंदोबस्त लागतो. हजारो लोक रस्त्यावर मिरवणूकीच्या निमित्ताने रस्त्यावर येतात. मस्तीत पण शिस्तीत असा नियम असतो. हा नियम बहुधा मोडलेला असतो. मस्तीत आलेला तरुण शिस्तीत असेलच असे नाही. जोशमें, शानसे मगर शांतीसे ही ब्रीद मनी बाळगावे असेही आवाहन करण्यात येते. एकत्र जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन, अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक आपले दुष्ट हेतू किंवा पूर्ववैमनस्यातून कुणी बदला घेण्याची इच्छा साध्य करु शकतात.
त्यामुळे रात्री वीज असणे, रस्ते जिथून मिरवणूक जाणार आहे तिथे रस्त्याची दुरुस्ती करणे, झाडांची छाटणी करणे, विद्युत तारा बाजूला करणे आदी बाबींचीही काळजी घ्यावी लागते. त्याच बरोबर मिरवणुकीत वापरण्यात येणारी वाहने योग्य स्थितीत तपासणी केलेली असावीत. जयंती मंडळे किंवा उत्सव समितीने सर्व नियम तयार करावेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा अवलंब करावा. पोलिस कायदे बनवत नाहीत तर त्या कायद्यांची आणि नियमांची अंमलबजावणी करीत असतात. काही समाजकंटक जाणिवपूर्वक उत्साह किंवा उत्सवाला गालबोट लावण्याचा, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर असा व्यक्ती दिसताच आपण आपले कर्तव्य म्हणून प्रशासनाला कळविले पाहिजे. खरे तर प्रशासनाचे कान आणि डोळे जनतेनींच व्हायला हवे आहे.
विविध धर्मीय सण उत्सवाकडे सहिष्णुतेने पाहिले पाहिजे. लोकांच्या या सहभागात बंधुभाव, एकत्व टिकवून ठेवण्याची गरज आहे. आपल्या काही चुकांमुळे, अतिउत्साहामुळे, कुणाच्या तरी चिथावणीमुळे आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. वैचारिक पातळीवर कार्यक्रम आयोजित करुन, रक्तदान शिबिराचे आयोजन करुन, अन्नछत्र चालू करुन, करिअर मार्गदर्शन शिबीर किंवा असे काही विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन आपण आपली जयंती, सण उत्सव साजरे करु शकतो परंतु एखादी छोटीशी अनुचित घटना आपले जीवनच काळवंडून टाकू शकते. जीवन अनमोल आहे. मृत्यू अटळ आहे. आपण आपल्या जीवनात मांगल्याची आराधना केली पाहिजे. पावित्र्य जपले पाहिजे.
मानवता सर्वश्रेष्ठ आहे. जीवंत असेपर्यंत आपण आपली जात, धर्म, पंथ वगैरे मानत असतो. मेल्यानंतर आपली झालेली माती, राख कोणत्याही जातीचा, धर्माचा, समुदायाचा किंवा पंथाचा उल्लेख करु शकत नाही. कोरोना काळाने मानवी जीवनाची अपरिमित हानी केली आहे. अत्यंत करुणेने, प्रेमाने, मैत्रीपूर्ण भावनेने एकमेकांकडे आपण पहायला हवे. आपल्या देशातील सर्वच महापुरुषांनी सद्गुणांची, समतेची, शांततेची, लोककल्याणाची निती शिकवली आहे. या विचारांना कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खोट्या अस्मितेसाठी दोन मानवी समुह शत्रुत्वाच्या भावनेने एकमेकांसमोर उभे राहू नये. श्रेष्ठ कनिष्ठतेचा मिथ्या अभिमान गाळून टाकला पाहिजे. आपल्याला मानवता हाच खरा धर्म पाळायचा आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
- प्रज्ञाधर ढवळे, नांदेड, मो. ९८९०२४७९५३.