विविध समाजोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करणार -मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड| समाजाच्या परिवर्तनासाठी समाजसुधारक व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी नांदेड जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. कोविड निर्बंधामुळे मागील दोन वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमास बंदी असल्यामुळे जयंती महोत्सव मोठ्या स्वरूपात घेता आला नाही. परंतु आता शासनस्तरावरून कोविड निर्बंध शिथिल झाल्यामुळे यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा, अभिवादन, व्याख्यान, समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, आंबेडकरी जलसा, अन्नदान, शीतल पेजल वाटप, जिल्हा परिषद मुख्यालयावर विद्युत रोशनाई आदी विविध उपक्रमांद्वारे मोठ्या स्वरूपात जयंती उत्सव साजरा केला जाईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
नांदेड जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी जयंती मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उ पमुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नांदेड जिल्हा परिषद महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिकारी-कर्मचारी संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्तम सोनकांबळे, बालासाहेब लोणे, प्रल्हाद थोरवटे, अशोक कासराळीकर, राजेश जोंधळे, सिद्धार्थ हत्तींबिरे, राजेंद्र मदनुरकर, विजयसिंह चव्हाण, पी.पी. पिंपळढोहकर, प्रताप रायघोळ, शिवसांभ चेड्डू, प्रमोद गायकवाड, अशोक बनसोडे, गणेश अंबेकर, शेख, दिनानाथ जोंधळे, सुनील कदम, वसंत शिरसे, पवन तलवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.