लातूर जिल्ह्यात होणारे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करु

राज्यमंत्री तथा स्वागताध्यक्ष संजय बनसोडे


लातूर|
दि. २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार असून हे साहित्य संमेलन अत्यंत दर्जेदार होईल या दृष्टीने नियोजन केले आहे. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, ते सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी करु असा विश्वास या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला खा.सुधाकर श्रृंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. विक्रम काळे, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, महापौर विक्रांत गोजमगुंडे, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे वेगळेपण - या साहित्य संमेलनाचे अनेक अर्थांनी वेगळेपण दिसून येणार आहे. कर्नाटक, तेलंगणा सीमेवर भरणाऱ्या या साहित्य संमेलनात सीमावर्ती जिल्ह्यातील लोक सहभागी होणार आहेत. तसेच बाल साहित्यिकांना मोठा वाव देण्यात आला आहे. पहिल्यांदा साहित्य संमेलनाच्या मंचावरून या देशाचाच नव्हे तर जगाचा अत्यंत ज्वलंत अशा पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार असल्याची माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष जयंत नारळीकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोधर मावजो यांच्यासह माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री तथा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती या संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली. या साहित्य संमेलनामुळे लातूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख अधोरेखित होणार आहे. हा जिल्ह्यासाठी महत्वाचा उत्सव असणार आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी व्हावं यासाठी आम्ही जिल्ह्याचे सर्व आमदार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी संगीतकार अजय - अतुल यांची संगीत रजनी - देशातील चित्रपट संगीतातील आघाडीची जोडी अजय - अतुल यांची 22 तारखेला संध्याकाळी संगीत रजनी होणार असून 23 तारखेला संध्याकाळी डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, यांचा " चला हवा होऊ द्या " हा कार्यक्रम होणार आहे तर 24 तारखेला संध्याकाळी संगीतकार अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहितीही बसवराज पाटील यांनी यावेळी दिली. या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम कसा असेल याची सविस्तर माहिती कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी यावेळी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी