लाच एक हजार रुपयांची आणि दंड तीन हजार रुपये
नांदेड| अर्धापूर भुमिअभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास एक हजार रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी अतिरिक्त तर्द्थ जिल्हा न्यायाधीश संजय दिघे यांनी 6 महिने सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
अर्धापूर तालुक्यातील मारोती माणिकराव बारसे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गट क्रमांक 294 मधील एक हेक्टर 3 आर या जमीनीबाबत अर्धापूर न्यायालयात वाद क्रमांक 39/2014 सुरू होता. त्या प्रकरणात न्यायालयाने भुमिअभिलेख कार्यालयाला जमीन मोजणी साठी आदेश दिला. त्यानुसार त्या जमीन मोजणीची फिस रुपये दहा हजार मारोती माणिकराव बारसे यांनी भरली. तरीपण भुमिअभिलेख कार्यालयातील सहाय्यक अमरसिंघ शेरसिंघ कामठेकर यांनी एक हजार लाच मागितली.
या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 6 जानेवारी 2015 रोजी ती लाच घेतांना अमरसिंघ शेरसिंघ कामठेकरला अटक केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक बळवंत पेडगावकर यांनी याप्रकरणी अमरसिंघ कामठेकरविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणी न्यायालयात चार साक्षीदारांची तपासणी झाली त्यात उपलब्ध पुरावा आधारावर न्यायाधीश संजय दिघे यांनी अमरसिंघ शेरसिंघ कामठेकर यास सहा महिने सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.रणजित देशमुख यांनी काम केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अंमलदार दर्शन यादव यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली. या खटल्यात अमरसिंघ कामठेकरच्यावतीने नांदेड येथील दुसऱ्या पिढीचे वकिल ख्यातनाम आणि प्रख्यात वकील ऍड.मनिष शर्मा (खांडील) यांनी काम केले.