मुंबई| सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाला अर्थसंकल्पात 406 कोटी 1 लाख रुपयांची तरतूद करून पशुसंवर्धनच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना दिली असल्याची प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.
गायी-म्हशींमध्ये स्त्रीभृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात - देशी गायी, म्हशींसाठी प्रयोगशाळा- देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी व म्हशींची स्त्रीबीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी-म्हशींमध्ये स्त्रीभृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात व शेतकऱ्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येईल.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळसाठी देखभाल दुरूस्तीकरिता 10 कोटी रूपये - “बैलघोडा हॉस्पिटल” म्हणून प्रसिध्द असलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना परळ येथे 2 ऑगस्ट 1886 रोजी झाली. या महाविद्यालयाच्या परिसरात 60 ते 120 वर्षे जुन्या 13 इमारती आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता 10 कोटी रूपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यात येणार - शेळी पालनासाठी सामूहिक सुविधा केंद्र- अमरावती जिल्हयातील पोहरा येथे शेळी समूह योजनेअंतर्गत श्रेणीवर्धन व क्षमतावाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
बैलगाडा शर्यतीमुळे स्थानिक जातींच्या सुदृढ गोवंशांची पैदास अबाधित राहणार - परंपरेने चालत आलेल्या बैलगाडा शर्यतींनी उत्तम, सुदृढ गोवंशाची पैदास आणि संगोपनाचे साधन म्हणून मोठी कामगिरी बजावली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या शर्यती सुरू राहाव्यात अशी ठाम भूमिका घेऊन सरकारने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि बैलगाडा शर्यतींची परवानगी मिळवली. महाराष्ट्रातील स्थानिक जातींच्या सुदृढ गोवंशांची पैदास यामुळे अबाधित राहण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.