कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक: परिषदेतील सूर ' लो कार्बन ' जीवनशैलीचा अंगीकार करावा. "
पुणे। 'कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन' या विषयावर 'तालानोआ डायलॉग' ही गोलमेज परिषद पुण्यात १२ मार्च रोजी दुपारी एक ते पाच या वेळात एम्प्रेस गार्डन येथे पार पडली. २०३० पर्यंत हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक आहेत , त्याचबरोबर ' लो कार्बन ' जीवनशैलीचा अंगीकार करावा ",असा सूर या परिषदेत उमटला.
समुचित एन्व्हायरोटेक,लया रिसोर्स सेंटर,इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज,सीसीपी एन्व्हायरोमेंटल फाउंडेशन यांनी ही परिषद बजाज सेंटर, एम्प्रेस गार्डन,पुणे येथे आयोजित केली होती. पर्यावरण विषयक २० संस्थांचे प्रतिनिधी,तज्ज्ञ असे या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. आणि त्यांनी २०३० पर्यत पुणे मेट्रोपॉलिटन रिजन कार्बन मुक्त करण्याच्या उद्दीष्टात योगदान देण्याचा निर्धार केला. या विषयावरील पुण्यातील ही दुसरी गोलमेज परिषद होती.
तालानोआ' हा फिजी शब्द असून सर्वंकष,सर्वसमावेशक आणि पारदर्शक संवादासाठी तो वापरला जातो.या परिषदेला त्या हेतूनेच 'तालानोआ डायलॉग' असे संबोधण्यात आले आहे.
प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या, ' जागतिक पातळीवर हवामान बदलाचे धोके टाळायचे असतील तर हे दशक अत्यंत महत्वाचे आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी वर बोलणारे पुणे हे पहिले शहर आहे. सरकारी प्रयत्न होतील न होतील, पण नागरिकांनी सजग राहून प्रयत्न करावे लागतील. कार्बन उत्सर्जन ३० टक्क्यांनी कमी करावे लागणार आहे. शहरीकरण वाढविताना पर्यावरण पूरक वसाहतींचे नियोजन करावे लागणार आहे. सौर उर्जेचा वापर वाढवावा, लागणार आहे '.
पौर्णिमा आगरकर म्हणाल्या, ' हवेतील कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्यासाठी सर्व पातळयांवर प्रयत्न झाले पाहिजेत. शहरात कार्बन उत्सर्जन वाढत आहे. प्रदूषणाचे बळी शहरातच वाढत आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर 'तालानोआ डायलॉग ' या संकल्पनेतून जनजागृती सुरू आहे. पुण्यातील ही दुसरी गोलमेज परिषद हा या जनजागृतीचाच भाग आहे '.
अदिती काळे म्हणाल्या, ' पृथ्वीची संरचना पाहता हवामान बदलाचा दुष्परिणाम जाणवत आहे. अवकाळी पाऊस, समुद्राची पातळी वाढणे,पीकाचे उत्पादन कमी होणे, असे अनेक दुष्परिणाम होत आहेत. कार्बन न्यूट्रॅलिटी चे ध्येय मानवजातीने डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. पुणे मेट्रोपॉलिटन रिजन हा २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.त्यासाठी पर्यावरणाचा विचार केला पाहिजे, उर्जेचा वापर कमी केला पाहिजे, जीवनशैली आणि मानवी सवयींवर पुनर्विचार केला पाहिजे '.
वैशाली पाटकर म्हणाल्या, ' कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाचे समुपदेशन झाले पाहिजे. या दशकात उद्योग, वाहतूक, पाणी व्यवस्थान, कचरा निर्मूलनामध्ये अनेक बदल घडवून आणावे लागतील. सरकार, नागरिक, उद्योग, संस्थात्मक पातळयांवर एकत्रित प्रयत्न करावे लागतील '. सुरुवातीला ' परिसर ' संस्थेतर्फे ' वायू प्रदूषण : बरं नाही लक्षण ' हे पथनाटय सादर करण्यात आले.