मनपाचा तणावमुक्त जीवन व मानसिक समस्यांवर एक दिवसीय परिसंवाद
नांदेड, अनिल मादसवार| सद्याचे जीवन हे धकाधक्कीचे व यंत्रमय झाले आहे. वाढती स्पर्धा व त्यातून कामाचा ताण यामुळे अनेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. मानसिक तणावातून अनेक अजारांना आपण आमंत्रण देतो. परंतु हे टाळायचे असेल तर तणावमुक्त जीवन जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी आज येथे केले.
मनपाच्यावतीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून व महापौर सौ.जयश्रीताई निलेश पावडे यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेत काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी तणावमुक्त जीवन आणि मानसिक समस्या या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील डॉ.शंकरराव चव्हाण नियोजन भवनमध्ये आयोजित केलेल्या या परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करताना डी.पी. सावंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महापौर सौ.जयश्रीताई निलेश पावडे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, सभागृह नेता ॲड.महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती संगिता पाटील डक, माजी महापौर सौ.शैलजा स्वामी, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.यशवंत पाटील, उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड.निलेश पावडे, अब्दुल हाफीज, परमेश्वर पवार, आरोग्य अधिकारी डॉ.बिसेन, डॉ.प्रतिभा पाटील खतगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी ख्यातनाम समुपदेशिका डॉ.किरण शांडिल्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डी.पी.सावंत पुढे म्हणाले की, सद्या मानवीय जीवनात अनेक ताणतणावाचे प्रसंग उद्भवतात. मानवी प्रगती हा विकासाचा जरी पाया असला तरी त्यातच मानवीय गंडाचा उगम होतो.अहंमगंड व न्यूनगंड यातून विकासासोबत परस्परविरोधी स्पर्धा सुरु होते. माझ्यापेक्षा इतरांची प्रगती मला घातक आहे. ही भावनाच मुळात तणावाला जन्म देते. प्रत्येकाने आपल्या सोबत समाजातील इतर घटकांचा विकास झाला पाहिजे हा सकारात्मक स्थायी भाव अंगिकारुन आपल्या दैनंदिन वर्तनात बदल केला तर तणावमुक्त जीवन जगता येते आणि हिच खरी आनंदी जीवन जगण्याची कला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना महापौर सौ.जयश्रीताई पावडे म्हणाल्या की, नांदेड हे मराठवाड्यातील मेडीकल हब झाले आहे. कोरोनाच्या काळात नांदेड शहरातील डॉक्टर्सनी नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या परभणी, हिंगोली, निजामाबाद, वाशिम या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार केला. या दरम्यान नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकांवर मोठा तणाव होता. पण त्यातही या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच आपली भूमिका चोख बजावली. त्यांच्यावर आलेला ताण व त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी उत्तम उपाय म्हणून समुपदेशन हाच पर्याय आहे आणि त्यासाठीच ख्यातनाम समुपदेशिका डॉ.किरण शांडिल्य यांचे व्याख्यान आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त डॉ.सुनिल लहाने, किशोर स्वामी, डॉ.किशोर अतनूरकर यांची समसयोचित भाषणे झाली.या कार्यक्रमास नांदेड शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, व मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
अती मोबाइलचा वापर, मानसिक आजाराचे उगमस्थान -डॉ.शांडिल्य
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरसह सर्वांवर सर्वच पातळीवरुन मोठा दबाव असतो. एका बाजूस कोरोनासारख्या आजारामुळे मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या रुग्णाला वाचविण्याचे आव्हान असते. तर त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांचा आपल्यावर असलेला मानसिक दबाव व त्यातून निर्माण होणारा ताण-तणाव यातून या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक आरोग्य धोक्यात येते.
अशावेळी डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे परिस्थिती जर डॉक्टर्सनी हाताळली तर त्यातून रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांचे समाधान होऊ शकते त्यासोबतच आपल्यातील चीडचिडेपणा कमी होतो. असे सांगतानाच अलिकडच्या काळात मोबाईलच्या वाढलेला अतिवापर आपल्या सर्वच इंद्रियांना नेहमीच सचेतन ठेवतो. त्यातून इंद्रियांना आराम मिळत नाही. आणि असेच जर सातत्याने घडत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवावर त्याचा दुष्परिणाम होतो. अति मोबाईलचा वापर हेच मानसिक आजाराचे उगमस्थान असल्याचे मत या प्रसंगी समुपदेशिका डॉ.किरण शांडिल्य यांनी व्यक्त केले.