1 एप्रिल पासून विनाहेल्मेट दुचाकी स्वारांचा परवाना होईल रद्द -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
सर्व दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास नागरिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गंत वाहन चालकास 500 रुपये दंड व अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. 
ही मोहिम ही 1 एप्रिल 2022 पासून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

$ads={1}

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मध्ये नमुद केल्यानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालवितांना हेल्मेट परिधान / घालणे हे सक्तीचे आहे. वेळोवळी मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. वाहन चालवितांना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. 

शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना विनाहेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे याबाबतची माहिती द्यावी असे सर्व कार्यालय प्रमुखांना परिपत्रकान्वये कळविले आहे.

 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने हेल्मेट जनजागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन


प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने हेल्मेटचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर केला त्यांचे  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुलाबपुष्प देवून नुकतेच अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी अविनाश राऊत, संदीप निमसे, मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, रत्नकांत ढोबळे, पद्माकर भालेकर, सेमावानी, गवळी, राजूरकर, जारवाल, गाजुलवाड, कंधारकर, देवदे, पवळे, बुरकुले यांची उपस्थिती होती. 

$ads={2}

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने परिपत्रक काढण्यात आले आहे. शहरातील एसजीजीएस कॉलेज, आयटीआय येथील विद्यार्थ्यांशी  संवाद साधून हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगण्यात आले. सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी यांना  हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगण्यात आले. नो हेल्मेट नो इन्ट्रीचे बॅनर व माहितीपत्रक शासकीय कार्यालयापुढे लावण्यात आले आहे. 31 मार्च पासून नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण प्रबोधनपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 1 एप्रिल 2022 पासून कडक हेल्मेट तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी