अर्धा हंगाम संपला; कारखान्याच्या उदासीनतेमुळे हिमायतनगरातील शेतकरी ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत -NNL

हिमायतनगर तालुक्यातील ६५ टक्के ऊस उभाच असून, तुरे फूटल्याने शेतकरी अडचणीत    

 


हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव कारखान्यां अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या उदासीनतेमुळे ऊस तोडणीची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने व साखर कारखान्यांच्या मनमानीमुळे तालुक्यातील ६५ टक्के ऊस तोडणी अभावी शेतात उभा आहे. त्यामुळे गावागावांत उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत असून, या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला, परंतु ऊस उभाच असल्याने उसाला तुरे फूटल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

हदगाव विधानसभा मतदार संघामध्ये एकच सुमाष शुगर प्रा.लि. साखर कारखाना असल्याने शेतकऱ्यांची भिस्त यावर अवलंबुन आहे. या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम ऑकटोबर - नोव्हेंबर मध्ये सुरू झाले. या वर्षी हिमायतनगर तालुक्यात हजारो हेक्टर ऊस लागवडीची नोंद आहे. ऊस लागवड होऊन आज १६ महिने होत असून, तालुक्यातील शेतकरी ऊस गाळपाला न गेल्यामुळे व उसाला तुरे फूटल्याने वजनात घट होत असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे अनेक शेतकरी हिमायतनगर शहरात असलेल्या सुमाष शुगर प्रा.लि. साखर कारखान्याच्या कार्यालयावर ऊस तोडणीसाठी कधी नंबर लागणार याची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील दोन वर्षांत पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात विक्रमी ऊस लागवड झाली आहे. 

यावर्षी ऊस गळितास जाणार की नाही..? या चिंतेने या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठय़ा कष्टाने दिवस-रात्र कष्ट करून तोडणीस आलेला ऊस पाठवायचा कोठे, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतामध्ये मागील पंधरा - सोळा महिन्यांपासून ऊस उभा आहे. त्यामुळे आज उसाची तोड होईल..... उद्या तोड होईल.... या आशेवर शेतकऱ्यांनी मागील महिना-दीड महिना उसाला पाणीही दिले नाही. त्यामुळे आजघडीला ऊस वाळून चालला आहे. त्यातच उसाला तुरे आल्याने वजन कमी होऊन ऊस पोकळ होत आहे. 

हिमायतनगर तालुक्यांमध्ये जवळपास चाळीस - पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास ऊसतोड झाली आहे. आदी तालुक्यांत ऊसतोडणी ठप्प आहे. या तालुक्यांत आतापर्यंत फक्त चाळीस टक्के उसाची तोड झाली असून, आणखी ६० टक्के ऊस तोडणीच्या शिल्लक आहे. यामुळे ऊस तोडणीची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसत हिमायतनगर तालुक्यां असून, याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. 

ऊस तोडणीसाठी तालुक्यात केवळ ५० टोळ्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, टोळी मिळत नसल्याने  ऊस तोडणीला उशीर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारखाना परिसरात या वर्षी लाखो टन उसाची नोंद होते. या कारखाना परिसरातील असलेल्या हदगाव- हिमायतनगर तालुक्यांतील शेकडो हेक्टर ऊस अदयाप शेतामध्ये उभा आहे. तर त्यातील हिमायतनगर तालुक्यांतील गावागावातीळ शेतकरी आणि नदीकाठावरील शेतकरी ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. यंदाचा हंगाम अर्ध्याहून अधिक झाला, तरीही ऊसतोड होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कारखान्याने तालुक्यातीळ उसाला प्राधान्य न देता इतर ठिकाणचा ऊस गाळपासाठी घेऊन आल्यामुळे हककच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. आता तालुक्यातील उभा ऊस तात्काळ तोंडाला जावा यासाठी हिमायतनगर तालुक्यात ऊस टोळय़ा वाढविणे गरजेचे आहे. त्यातच या परिसरातील गुऱ्हाळ नाही, त्यामुळे हजारो टन ऊस गाळपअभावी शेतात उभा आहे. तोडणीस आलेला पाऊस कुठे पाठवायचा अशा विवंचनेत आम्ही सर्व शेतकरी आहेत. याकामी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून ऊस तोडणी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी