शेतशिवार आणि वाडी-तांड्यांतही घेणार साहित्य संमेलने
नांदेड| येत्या गुढीपाडव्यापासून नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नवनव्या संकल्पनां-उपक्रमांसह मराठी साहित्य संस्कार मंडळ शेतशिवार, गावं, वाडी-तांडे आणि शहरांमध्येही साहित्य चळवळीचे नवे पर्व सुरू करणार असून नामवंत साहित्यिकांचा सन्मान करीत, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठावर अग्रक्रमाने संधी देत आणि शालेय विद्यार्थ्यांमधून शोध घेत नवे साहित्यिक घडविणार असल्याची माहिती या मंडळाचे संस्थापक दत्ता डांगे यांनी दिली आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ रामदास, आणि नंतरच्या कितीतरी साहित्यिकांच्या उपदेशाने- साहित्याने आपण सर्वजण घडलो आहोत. काहीं संत आणि साहित्यिकांचे साहित्य हे वेगवेगळ्या भाषेत, लिपीत होते परंतु नंतर ते मराठीत आले आणि आपलेच होऊन गेले. बालपणा- पासूनच व पुढे शालेय जीवनातही मराठी साहित्यातील सहिष्णुतेच्या संस्कारांनी आपणां सर्वांची जडणघडण झालेली आहे. जीवनाला उन्नत केले आहे. मानवता शिकविली आहे. मनातील सुखदुःखाच्या भावनेला वाङ्मयप्रांतातून वाट करून दिली आहे. तेव्हा हे मराठी साहित्याचे संस्कार, मराठी साहित्याचा निर्मळ प्रवाह पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या मराठी साहित्य संस्कार मंडळाची-चळवळीची सुरुवात होत आहे असे दत्ता डांगे यांनी म्हटले आहे.
या संमेलनांतून ग्रंथचळवळीला संजीवनी देऊन नवी उभारी देण्याचे कामही केले जाणार आहे. एखाद्या मंडळाकडून आर्थिक व मनुष्यबळाच्या आणि इतरही अनेक मर्यांदामुळे वर्षातून एखादेच साहित्य संमेलन होण्याऐवजी ते वेगवेगळ्या गावी, वाडी-तांडे आणि शहरातही वर्षभरही पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही झाले पाहिजेत. यासाठी आता मान्यवर साहित्यिकांनी नवा दृष्टिकोन ठेवावा तर नवतरुण साहित्यिकांनी चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी अशी अपेक्षाही यावेळी दत्ता डांगे यांनी व्यक्त केली.
नव्या दृष्टिकोनानुसार सर्वच साहित्यिकांनी आपण 'साहित्यपंढरी'चे वारकरी आहोत हे तना-मनात रुजवूनच व आयोजकांकडून कुठलीही आर्थिक अपेक्षा न ठेवता या 'साहित्यदिंडी'त सामील व्हावे असे आवाहनही शेवटी या मंडळाचे संस्थापक दत्ता डांगे यांनी केले आहे.